सोलापूर -: येणारा काळ कठिण परिक्षेचा असून प्रत्येकाने निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे काम करुन सर्वसामान्य जनतेची कामे करावीत अशी अपेक्षा नुतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
    श्री शिवछत्रपती रंगभवन येथे मावळते जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांचा निरोप समारंभ आणि नुतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, राजेश प्रधान, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, भारत वाघमारे, साहेबराव गायकवाड, दिनेश भालेदार उपस्थित होते.
    नूतन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम पुढे म्हणाले की, सगळ्यांच्या सहकार्याने दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीला जिल्हा प्रशासनास तोंड द्यावयाचे आहे. प्रशासनातील मागण्या निश्चितच चर्चेने सोडविल्या जातील. चांगल्या कामासाठी प्रत्येक अधिकारी - कर्मचा-याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रसंगी कठोर निर्णय गरज पडल्यास घेतले जातील असेही ते म्हणाले.
    मावळते जिल्हाधिकारी गोकुळ मवारे आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येकाने आयुष्यात समाधानी राहून आयुष्याकडून माफक अपेक्षा ठेवल्यास निश्चितच प्रत्येक जण सुखी होईल. सोलापूर प्रशासनातील प्रत्येक घटकाने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन नूतन    जिल्हाधिका-यांनाही अशीच साथ मिळेल असेही ते म्हणाले.
    पोलीस आयुक्त श्री. रासकर यावेळी म्हणाले की, शासन हे प्रशासनावर चालते गतीमान प्रशासन असल्यास शासन नक्कीच यशस्वी होते. मावळते जिल्हाधिकारी श्री. मवारे हे मृदुभाषी व अहंकार नसलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आपल्या वागण्यातून सर्वसामान्य जनतेसह प्रशासनातील प्रत्येक घटकाचे सकारात्मकरित्या काम केले. नुतन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम धाडसी व्यक्तीमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा नक्कीच नावलौकिक कमवेल.
     पोलीस अधीक्षक प्रधान म्‍हणाले की, प्रशासनातील सर्व घटकांनी मिळून काम केले पाहिजे. एकमेकांमध्ये संवाद ठेऊन काम केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही.  याचा अनुभव मवारे साहेबांच्या काळात आपण सर्वांनी घेतला आहे. नुतन जिल्हाधिका-यांच्या काळातही इच्छाशक्ती निर्माण करुन प्रत्येकाने चांगले काम करावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून लागणारी सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
      अप्पर जिल्हाधिकारी यांनी मवारे साहेबांच्या कामाचा झपाटा आपल्या मनोगतातून सांगितला तर नुतन जिल्हाधिका-यांचा धाडसीपणातून जिल्ह्यात नक्कीच चांगले काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी माणूसकी ठेऊन काम करणारा अधिकारी या शब्दात मावळत्या जिल्हाधिका-यांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.    
     कार्यक्रमास सर्व विभागाचे अधिकारी - कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
 
Top