कुंभनगरी (अलाहाबाद) -: 'हर हर गंगे', 'हर हर महादेव' या घोषणांनी कुंभमेळाव्याला आज पहिल्या शाहीस्नानाने सुरवात झाली. पहाटे 4.30 वाजता आखाड्यांतील साधू-संत आपल्या लवाजम्यासह संगम घाटाकडे निघाले.
          ढोल-ताशांच्या साथीने साधू-संतांनी गंगेच्या संगमेत शाही स्नानांच्यावेळी डुबक्या घेतल्या. याचवेळी साधू-संतांबरोबरच सामान्य भाविकांची गर्दी होती. त्यांनीही गंगेच्या वेगवेगळ्या घाटावर स्नान घेतले. कालच्या रात्री कुंभनगरीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. 13 जानेवारीला कुंभमेळाव्यात अचानक गर्दी वाढली. सायंकाळपर्यंत लाखो भाविक दाखल झाले होते. कुंभमेळावा प्रशासनाने अंदाज व्यक्त केला आहे की, शाही स्नानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज (सोमवारी) सुमारे ८० लाख भाविक संगम आणि इतर घाटांवर स्नान करतील. संगम घाट पूर्णपणे साधू-संतांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. कुंभमेळ्यात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी आख्यायिका आहे. परंपरेप्रमाणे नागा साधू यांनी पहिल्यांदा संगम घाटावर पाण्यात डुबकी मारली. त्यानंतर हा संगम सामान्य भाविकांसाठी खुला करण्यात आला.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top