महिलांना आर्थीक बळ मिळावे, त्यांचा सर्वागिण विकास व्हावा, महिलांतील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, घरबसल्या रोजंदारी मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास व्हावा, त्यांना व्यापार-उद्योगाची माहिती व्हावी, यासाठी शासन सर्वस्तरावर प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यान्वित केली.  या यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ उभी करुन  महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून प्रगती केलेल्या बचत गटाची ही यशोगाथा!     
           उस्मानाबाद शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर बसलेले वाघोली हे गाव. येथील भामाबाई  दत्तू लोहार. शिक्षणही जेमतेम.  त्यांनी  सन 2009 मध्ये वैभव लक्ष्मी महिला बचतगट स्थापन केली.  यात 11 महिलांना सभासद करुन घेतले. त्या स्वत: बचतगटाच्या अध्यक्ष तर  सुमन सदाशिव चव्हाण या सचिव आहेत.  सुरुवातीला 11 महिलांनी दरमहा प्रत्येकी 100 रुपये बचत करुन  बचतगटाची सुरुवात केली.
             व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान व कौशल्य, कौशल्यवृद्धीसाठी व्यवसायाचे प्रशिक्षण आमच्याकडे नव्हते. त्यातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मदतीला आली, त्यांच्या मदतीने   समतानगर, उस्मानाबाद येथे  3 ते 7 दिवसाचे प्रशिक्षण घेतले आणि आजची वाटचाल सुरु झाली, असे भामाबाई सांगतात.
या प्रशिक्षणात रुचकर व स्वादिष्ट जेवणे तयार करणे, पापडया, कुरडया, खारुडया, चटण्या, दही, धपाटे, खीर व बाजरीची भाकरी बनविण्याचे शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले. बचतगटाच्या माध्यमातून लग्नसमारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे, सत्यनारायण पुजा, आदि विविध सण व उत्सवात खाद्य पुरविणे, मिटींगसाठी जेवण व नाष्टा पुरविल्याने आमच्या गटास  हळू-हळू कामे मिळू लागली. महिनाभरात किमान 20 ते 25 दिवस बाहेरगावी जावून जेवण,नाष्टा पुरविण्याचे काम करत असल्याचे  त्या सांगतात.
        जेवण बनविण्यासाठी आम्ही विविध भांडी घेतली. त्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या 3 वर्षात बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळू लागले.  बचतगटाने याच उत्पन्नातून  10 गुंठे शेतजमीन 99 वर्षाच्या करारावर खरेदी केली. गटाच्या सदस्या तारामती भक्ते यांना 2 शेळया खरेदी करुन दिल्या. शेळीपालनाचा हा व्यवसाय ताराबाईंनी वाढवला. आता त्यांच्याकडे  15 शेळया आहेत.  महानंदा राऊत यांनी एक म्हैस खरेदी केली. त्यापासून त्यांना दररोज किमान 250 ते 300 रुपयाचे उत्तन्न मिळू लागले. कुसुम नामदेव राऊत यांनी लॉड्रीचे दुकान टाकल्यामुळे त्यांना घर बसल्या रोजगार प्राप्त झाला.  संगीता राऊत या महिलेने  कुक्कुट पालनाच्या माध्यमातून रोजगार मिळवला. हिराबाई दणके  व वंदना विनोद मगर या दोघींनी पिठाची गिरणी सुरु केली. रंजना मगर यांनी शेतीच्या पिकास पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पाईपलाईन केली आणि शेती ओलीताखाली आणली. त्यातून शेतीचे उत्पन्न वाढविले. मंडाबाई राऊत यांनीही अशाच पद्धतीने प्रगती साधली.
        बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित केले. या महिलांनी पुढाकार घेवून पोलीसाच्या मदतीने दारु विक्रीची दुकाने बंद करण्यास भाग पाडली. गावात छोट्या छोट्या कारणामुळे  विभक्त्‍ होणारे संसार जुळविण्यासाठी पुढाकार घेतला. 
        महिलाबचत गटाच्या माध्यमातून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठीप्रयत्न केले.  हुंडाबंदीबाबत जनजागृती केली.  विविध समाजापयोगी कार्य बचतगटाच्या माध्यमातून राबविणे सतत सुरु असते. बचतगटाच्या महिला ग्रामसभेस उपस्थित राहून गावच्या काही अडचणी असल्यास त्यांच्या निदर्शनात आणून देण्याचे काम करतो, हे त्या अभिमानाने सांगतात. 
उस्मानाबाद येथे लेडिज क्ल्ब मैदानावर नुकतेच जिल्हास्तरीय बचतगट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि ग्रामसखी-हिरकणी महोत्सव घेण्यात आल. त्यातही या बचत गटाने सहभाग घेतला. या पाच दिवसात 12 ते 15 हजार रुपयाचे गटास उत्पन्न झाले. स्वत:च्या कष्टातून उत्पादीत केलेल्या वस्तूला मिळालेली ही बाजारपेठ पाहून आणि वस्तू विक्री झाल्यानंतर कष्टाचे मोल झाल्याची भावना बचतगटातील महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होती, असे भामाबाई सांगतात.
           प्रदर्शनास येणाऱ्या सर्वांना त्यांच्या पसंतीनुसार जेवण, नाष्टा पुरविल्याचे समाधान आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासन महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याने महिला बचत गटांना बेरोजगार महिलांना घरबसल्या मिळाला. आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. शासनाने महिला बचत गट बळकट करुन महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास बळ दिले. यापुढेही शासनाने असेच  उपक्रम राबविल्यास समाजातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. शिवाय पर्यायाने समाजाचा विकास होईल, यात तिळमात्र शंका नाही!                        
                    बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होता येते. कोणासमोर हात पसरायची किंवा हात जोडायची गरज भासत नाही. दैनंदिन कामकाज केल्यास आपोआप पैसा मिळतो. यातून आम्हाला स्वावलंबी होता आले. संसाराची गाडी आज महिलांनी रुळावर आणल्याने खऱ्या अर्थाने आम्ही महिला स्वतंत्र निर्णय घेत असून आम्हाला आत्मविश्वास मिळाला, असे त्या सांगतात.    
                                                                                                                        शंकर शेळके,
                                                                                                           जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                       उस्मानाबाद
 
Top