मुंबई -: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना देण्याचा निर्णय झाला आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र अशा स्वरुपाच्या या पुरस्काराचे वितरण लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.      
         ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी आणि धर्मेंद्र जोरे यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. याआधी हा पुरस्कार सकाळचे वसंत देशपांडे आणि महाराष्ट्र टाइम्सचे संदिप प्रधान, लोकसत्ताचे देवेंद्र गावंडे आदींना प्रदान करण्यात आला होता.
     एस. एम. देशमुख हे पत्रकारांचे न्याय अधिकार आणि हल्ल्यांपासून संरक्षण यासाठी गेली काही वर्षे लढा देत आहेत. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे ते निमंत्रक आहेत. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ते `लोकपत्र` दैनिकाचे संपादक झाले. रायगडहून निघणा-या `दैनिक कृषिवल`चे ते तब्बल 17 वर्षे  संपादक होते. त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एमए आणि बॅचलर ऑफ जर्नलिझमच्या पदव्या घेतलेल्या एस. एम. यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
     पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी श्री. देशमुख देत असलेल्या लढ्याचा आणि त्यांच्या निस्पृह पत्रकारितेचा गौरव म्हणून त्यांना हा पुस्कार देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
 
Top