उस्मानाबाद -: देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीरसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी नागरीकांनी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. यापुढील काळातही जिल्ह्यात माजी सैनिकांना विविध सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
        येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सशस्त्रसेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत हेाते. अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वानखेडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर चंद्रसेन कुलथे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, लक्ष्मण सरडे आदिंची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
         यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की,शूर सैनिकांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांच्यासाठी आपण जेवढे करु तेवढे प्रयत्न अपुरेच आहे.कारण त्यांनी आपला पुत्र आणि आपला पती देश कल्याणासाठी गमावला आहे. या शुर सैनिकांच्या बलिदानाचा आपल्याला विसर पडता कामा नये, यासाठी आपण त्यांच्या कल्याणाच्या जेवढी मदत करता येईल, तेवढी केली पाहिजे. माजी सैनिकांच्या विविध अडचणी दूर करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुका पातळीवर माजी सैनिकांसाठी उपयुक्त ठरणारे सभागृह उभारता येणे शक्य आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. याबाबत राज्य शासन स्तरावर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल,असे त्यांनी नमूद केले.
          उस्मानाबाद जिल्ह्याला ध्वजनिधी संकलनाचे यावर्षी 37  लाख 80 हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचा उल्लेख करुन पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातून यावर्षी 51 लाख रुपयांचे ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल,असे सांगितले. यासाठी महसूल विभागासह शिक्षण,आरोग्य,राज्य परिवहन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा मोठ्या विभागांसह सर्वसामान्य नागरीकांनीही आपले योगदान दयावे,असे आवाहन केले.सैनिक कल्याण कार्यालयासाठी उस्मानाबाद शहरातील जागा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल,असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
           सुरुवातीला पालकमंत्री चव्हाण यांना सशस्त्र ध्वज दिनानिमित्त ध्वज लावून निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला. सन 2011 मध्ये ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या विविध विभाग प्रमुखांचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर जिल्ह्याचे 2011 चे ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी फुलारी यांचा चषक देवून सत्कार करण्यात आला.
        पालकमंत्री चव्हाण यांनी या कार्यक्‌रमात वीरपत्नी श्रीमती रतन महाडिक, प्रभावती निकम, गयाबाई सोनटक्के,बेबीताई नारंगवाडे, ललिता जाधव, रेहना बेगम, लक्ष्मीबाई गायकवाड, कांताबाई कदम, मीनाक्षी भिसे या वीरपत्नींचा गौरव केला. त्याचबरोबर सोजरबाई कोकरे, माताबाई नागरगोजे या वीरमातांचाही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
          याचबरोबर सन 2012 -13साठीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शैलेष अशेाक पाटील या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अपंग माजी सैनिक भाऊ लक्ष्मण वाघमारे यांना केंद्रीय सैनिक बोर्डाकडून मिळालेल्या होंडा ऍक्टीव्हा या तीनचाकी वाहनाच्या  चाव्या श्री. चव्हाण यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केल्या.
        अप्पर जिल्हाधिकारी फुलारी म्हणाले की, ज्या व्यक्तिंनी देशवासीयांच्या  रक्षणासाठी रक्त सांडले,त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी जमा केलेला हा निधी म्हणजे सत्कार्याचा एक भाग आहे. त्यामुळेच यापुढेही जिल्ह्याचे ध्वजनिधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल आणि माजी सैनिकांच्या जिल्हा पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.
       कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मेजर कुलथे यांनी केले. ध्वजनिधी संकलनात जिल्ह्यातील नागरीकांनी दर्शविलेला सहभाग म्हणजे माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे असल्याचे ते म्हणाले. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पुनर्नियुक्तीच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. याचबरोबर स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. तसेचे महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळाच्या माध्यमातून करार तत्वावर रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
       यावर्षीच्या निधी संकलनासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने 35 हजार 500 रुपयांचा धनादेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी  वानखेडे यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते मेजर कुलथे यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या विद्यार्थींनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण व श्रीमती कृपा सांगेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कल्याण संघटक एस.डी. होमकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top