मुंबई - कामिनी आणि पूनमच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या लढतीत वेस्ट इंडीजला 105 धावांनी नमवले. तिरुष कामिनी (100) चे पहिले शतक आणि पूनम राऊतसह (72) तिने दिलेल्या तब्बल 175 धावांच्या दमदार सलामीमुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध मजबूत स्कोअर उभा केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 284 धावा ठोकल्या.
प्रत्युत्तरात विंडीजचा डाव अवघ्या 179 धावांत आटोपला. 
धावांचा पाठलाग करणा-या वेस्ट इंडीजला 179 धावांवर रोखण्यात भारतीय गोलदांज निरंजनाची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने तीन गडी बाद केले. झुलन गोस्वामीने दोघींना तंबूत पाठवले.
         ब्रेबॉर्न स्टेडियमवर 22 वर्षीय कामिनीने आपल्या 22 व्या सामन्यात कारकीर्दीतील पहिले वनडे शतक झळकावले. तिने 146 चेंडूंचा सामना करताना 100 धावांची खेळी केली. यात तिने 11 चौकार आणि एक षटकार मारला. कामिनीने पूनमसोबत पहिल्या विकेटसाठी 37 षटकांत 175 धावांची मजबूत भागीदारी केली. पूनमने 94 चेंडूंचा सामना करताना 72 धावा काढल्या. या खेळीत तिने सात चौकार मारले. पूनमची विकेट 175 तर कामिनीची विकेट 224 च्या स्कोअरवर पडली. पूनमला शेनले डेलेने बाद केले, तर कामिनी 100 धावा झाल्यानंतर धावबाद झाली.  
         भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामीने 21 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 36 धावा ठोकल्या. हरमनप्रीत कौरने 22 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या साह्याने झटपट 36 धावा काढल्या. वेस्ट इंडीजकडून मध्यमगती गोलंदाज दियांद्रा डोटिनने चार षटकांत 32 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. डेलेने 9 षटकांत 51 धावा देत एक विकेट घेतली.  
कामिनी-पूनमने मैदान गाजवले 
          भारताचा वर्ल्डकपचा पहिला सामना असल्याने युवा खेळाडूंवर दबाव होता. प्रथम फलंदाजी करताना कामिनी-पूनमने सुरुवातीला टिकून खेळण्यावर भर दिला. दोघींनी एकेरी, दुहेरी धावा काढताना दुबळ्या चेंडूवर चौकार मारले. खेळपट्टीवर पाय रोवल्यानंतर दोघींनी धावगती वाढवली आणि भारताला दणकट सलामी मिळवून दिली.
 *कामिनीच्या शतकामुळे भारताच्या 284 धावा
 *कामिनी-पूनम राऊतची 175 धावांची दणदणीत सलामी
 *पूनमच्या 72 धावा
वेस्ट इंडीजची टीम 179 धावांत गारद
विजयासाठी आवश्यक असलेल्या 285 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 179 धावांत आटोपला. वेस्ट इंडीजकडून कॅम्पेबेल 21, नाईट 11, डोटिन 39, डेले 28 धावा काढून बाद झाल्या. भारताकडून निरंजनाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. याशिवाय झुलन आणि सुल्ताना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
146 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार एक षटकार कामिनीने मारला
60धावा तिचा मागचा सर्वेश्रेष्ठ स्कोअर होता
22 व्या वनडे सामन्यात ठोकले कारकीर्दीतील पहिले शतक
175 धावांची मजबूत सलामी कामिनीने पूनमसोबत दिली.

संक्षिप्त धावफलक
भारत : 6 बाद 284 धावा. (तिरुष कामिनी 100 धावा, पूनम राऊत 72 धावा, झुलन गोस्वामी आणि एच. कौर यांच्या प्रत्येकी 36 धावा, 3/32 डोटिन) वेस्ट इंडीज : 179 (डोटिन 39, डेले 28, 3/52 निरंजना.)
 
Top