उस्मानाबाद -: टंचाईग्रस्त भागात चारा छावण्यांसाठी असणारी पाच लाख रुपये अनामत रकमेची अट पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यामुळे केवळ मराठवाड्यासाठी शिथील करण्यात आली आहे. आता मराठवाड्यातील भागासाठी अनामत रकमेची अट दोन लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
       उस्मानाबाद जिल्ह्यासह जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्हा टंचाईचा सामना करतो आहे. राज्य शासनाने चारा छावण्यांसाठी अनामत रकमेची अट पाच लाख रुपये ठेवल्याने छावण्या सुरु करण्यासाठी या भागात कोणी पुढे येत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई येथे मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्य़ा अध्यक्षतेखाली मंत्री उपसमितीची बैठक झाली. त्या बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनी ही वस्तुस्थिती या समितीसमोर मांडून चारा छावण्यांबाबतची अनामत रकमेची अट मराठवाड्यासाठी शिथील करण्याची मागणी केली. त्यास डॉ. कदम यांनी मान्यता दिल्याने टंचाईच्या काळात जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी अधिकाधिक संस्था पुढे येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी ही अट आता दोन लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.
          सध्या उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ७ चारा छावण्यांना मंजूरी दिली आहे. त्यापैकी भूम तालुक्यात चार छावण्या कार्यान्वित झाल्या आहेत तर मराठवाड्यात ३४ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी १४ कार्यान्वित झाल्या आहेत.
याशिवाय, राज्यात गाई-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम अशी योजना यावर्षीपासून राज्यात राबविण्यासही राज्य मंत्रीमंडळाने नुकतीच मंजूरी दिली आहे. राज्यातील दुग्धोत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चव्हाण यांनी या योजनेसाठी आग्रह धरला होता.  

 
Top