उस्मानाबाद -: राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायास गती देण्यासाठी १२ व्या पंचवार्षिक योजनेत कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्याच्या नवीन योजनेस मुंबईत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे, अशा शेवटच्या ५ जिल्ह्यांमध्ये ही योजना सन २०१२-१३ मध्ये राबविण्यात येणार आहे. पुढील कालावधीत उपलब्ध निधी विचारात घेऊन वरील निकषानुसार इतर जिल्हयांमध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
      ग्रामीण भागात या व्यवसायाद्वारे होणारी रोजगार निर्मिती तसेच कुक्कुट व्यवसायाच्या योजनेस मागील वर्षी लाभार्थ्याकडून मिळालेला मोठा प्रतिसाद, ही बाब विचारात घेवून विषयाधीन योजना मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेत एक हजार कुक्कुट पक्षांचे संगोपन करावयाच्या या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रती युनिट २ लाख २५ हजार रुपये प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच १ लाख १२ हजार ५०० रुपये मर्यादेत अनुदान देण्यात येईल. अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेतून अनुसुचित जाती, जमातीं या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के म्हणजेच १ लाख ६८ हजार ७५० रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येईल. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के तसेच अनुसुचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना २५ टक्के रक्कम स्वत: अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभी करावी लागणार आहे. लाभार्थ्यांना कुक्कुट पक्षी पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यक ती पशु वैद्यकीय सेवा व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रती वर्षी ५ ते ६ बॅचेसमध्ये कुक्कुट पक्षाचे संगोपन करावयाचे आहे.  प्रत्येक बॅच १००० पक्षांची राहील.  प्रत्येक बॅच करिता आवश्यक त्या निविष्टा म्हणजेच एक दिवशीय कुक्कुट पक्षी, पक्षी खाद्य, औषधे आदी स्वखर्चाने उपलब्ध करून घेऊन ४५ ते ५० दिवसानंतर पक्षांच्या विक्रीची व्यवस्था लाभार्थ्यांना स्वत: करावी लागेल. यापूर्वी सुरु असलेली कंत्राटी पध्दतीने कुक्कुटपालन व्यवसाय रद्द करून त्याऐवजी ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.
    लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समिती करण्यात येणार आहे.
 
Top