मुंबई : राज्यात टंचाईग्रस्त भागात 1586 गावे व 4305 वाड्यांसाठी 2020 टँकर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती वने, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
      राज्यात एकूण 488 चारा छावण्यांमध्ये 3.65 लाख मोठी व 48 हजार लहान जनावरे आहेत. छावण्यांवर एकूण 318.92 कोटी रु. खर्च करण्यात आला असून चारा वितरणासाठी 684.29 कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. पाणी पुरवठा कऱण्याकरिता पाणीपुरवठा विभागास 413.98 कोटी रु.निधी वितरित करण्यात आला आहे, असे डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
       डॉ.कदम पुढे म्हणाले, राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता संध्याकाळी 6.00 ते सकाळी 7.00 पर्यंत लोड शेडींग असणार नाही.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 23,355 कामे चालू असून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमधून केंद्रिय निकषांनुसार या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत मदत देण्यात येणार आहे.
    पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता उस्मानाबाद, उद्‌गीर, लातूर, चाळीसगाव, पुसेगांव, जामनेर,जळगांव, धुळे, बीड,निलंगा, औसा, पाचोरा या शहरांच्या नागरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी 17 कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत. या योजना प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यावर आतापर्यंत 231 कोटी रु. खर्च झाले आहेत. मनमाड शहरासाठी दररोज 50 लाख लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी 26 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे असे सांगून डॉ.कदम  म्हणाले मराठवाड्यात छावण्याची संख्या वाढविण्यात येणार असून सहकार आयुक्त व साखर आयुक्त यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.  सहकारी संस्था व साखर कारखाने यांनी या कामी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top