मुंबई -: भारतातील उच्च शिक्षण घेणा-या व्यक्तींचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षितांचे तसेच कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण सर्व स्तरातील उपेक्षित लोकांपर्यंत पोहचणे तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठे आणि लवचिक दूरस्थ शिक्षण संस्थांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी काल केले. 
    श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘भारत-कॅनडा मुक्त आणि लवचिक दूरस्थ शिक्षण’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन काल विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस् येथे राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मलेशियाच्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.तान् सेरी अन्वर अली, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु वसुधा कामत व मुक्त शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षण तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
     देशातील अधिकांश विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावी नंतर किंवा त्यापूर्वीच अर्थाजन करण्यासाठी रोजगार शोधण्याकडे कल असतो. मात्र योग्य कौशल्याअभावी त्यांना रोजगार मिळत नाही. आज अनेक उद्योगांना योग्य कौशल्य असलेले उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठ व दूरस्थ शिक्षण संस्थांनी लवचिक, कमी खर्चाचे व अर्धवेळ कौशल्यवर्धन अभ्यासक्रम सुरु करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यातील 65 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे मुक्त विद्यापीठे व दूरस्थ शिक्षण संस्थांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र योजना तयार कराव्यात. नोकरीत असलेल्यांसाठी वेगळे कौशल्यवर्धन अभ्यासक्रम आखावे असेही राज्यपालांनी सुचविले.
    देशातील महिलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या अर्धे असले तरी केवळ नऊ टक्के महिला उत्पादक कामगार म्हणून काम करीत असल्याची वस्तुस्थिती वसुधा कामत यांनी यावेळी मांडली.
     मलेशिया मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु अन्वर अली म्हणाले, दूरस्थ शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी टिकविणे हेच मूळी एक आव्हान आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने मुक्त विद्यापीठातील शिक्षण सर्वांना परवडणारे व सहजरित्या उपलब्ध होणारे असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
Top