उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत  उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ग्रंथ व पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांत सहभागी होणार असून कवीसंमेलन, व्याख्यान, साहित्यिक गप्पा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी जिल्ह्यातील  रसिक वाचक व पुस्तकप्रेमींना मिळणार आहे. दि. 26 रोजी सकाळी 10-30 वाजता जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे आणि प्रख्यात साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या ग्रंथोत्सवात सातारा,सोलापूर, पुणे,लातूर, औसा, औरंगाबाद आणि परभणी येथील ग्रंथविक्रेतेही सहभागी होणार आहेत.
    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथोत्सवाच्या उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे एस.एल. हरिदास उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी हे राहतील.
         उदघाटनाच्या दिवशीच सायंकाळी 6-30 वाजता निमंत्रितांची काव्यसंध्या हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे.यात माधव गरड, राजेंद्र अत्रे,  बालाजी इंगळे, डी.के. शेख,  सुभाष चव्हाण, देवीदास पाटील, प्रा. हनुमंत काळे,  शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे,  तृप्ती अंधारे, प्रमिला राठोड, सतीश मडके, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने,  डॉ.विजय परदेशी या  जिल्ह्यातील मान्यवर कवींचा  सहभाग असणार आहे. या  काव्यसंध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी रवींद्र केसकर हे करणार आहेत.
    दि.27 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार केला जाणार आहे.  दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस आणि दैनिक संघर्षचे संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या हस्ते या लेखकांना गौरविण्यात येणार आहे. यात वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, श.मा. पाटील, भ.ना.कदम, शिवमुर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, योगीराज वाघमारे, भारत गजेंद्रगडकर या ज्येष्ठ लेखकांचा समावेश आहे.या कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुनील हुसे आणि नगर वाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        त्याचदिवशी सायंकाळी 6-30 वा. आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उस्मानाबाद आणि तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनुक्रमे डॉ. वैशाली कडुकर आणि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कमलताई आवटे, भूम आणि परंडा येथील तहसीलदार अनुक्रमे अहिल्या गाठाळ आणि वैशाली पाटील, उस्मानाबाद आणि तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अनुक्रमे प्रियदर्शिनी मोरे आणि तृप्ती ढेरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे.
         दि.28 रोजी सायंकाळी 4 वा. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार असून प्रसिध्द लेखक-वक्ते प्रा. मिलींद जोशी यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
          या सर्व कार्यक्रमास जिल्ह्यातील पुस्तक प्रेमी आणि रसिक वाचकांनी आवर्जून उपस्थिती  लावावी आणि पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले आहे.   
         गतवर्षी झालेल्या ग्रंथोत्सवास उस्मानाबादकर साहित्य प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. यावर्षीही पुस्तके पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी असाच प्रतिसाद लाभेल,अशी अपेक्षा आहे.                                              
 
Top