
तत्पुर्वी पालकमंत्री ना. चव्हाण यांनी बोरी येथील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या हावळे या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचेही सांत्वन केले. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे त्यांनी उपळाई येथील जखमी रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली. गुरुवारी सकाळी चव्हाण यांनी आपल्या बाकीच्या कार्यक्रमांना दूर ठेवत सर्वप्रथम बोरी येथे भेट दिली. तेथे त्यांनी हावळे कुटुंबियांची विचारपूस करुन त्यांची सांत्वना केली. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद मार्गे चोराखळी येथे अपघातात बळी गेलेल्या नागरीकांच्या उपळाई येथील घरी भेट दिली. अचानकपणे कोसळलेल्या या संकटावर मात करण्याची शक्ती आणि बळ या कुटुंबियांना मिळावे तसेच त्यांच्या आर्थीक आधारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे यावेळी श्री. चव्हाण यांनी सांगितले. आम आदमी वीमा योजना तसेच विविध शासकीय योजनांमधून तातडीने जी मदत शक्य आहे ती करावी असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी तहसीलदारांना दिले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संजय गांधी निराधार योजना तालुका समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, विश्वास शिंदे आदि यावेळी त्यांच्यासोबत होते.
जिल्हा रुग्णालयात जावून त्यांनी अपघातात जखमी रुग्णांची भेट घेतली तसेच त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्यावर केल्या जात असलेल्या उपचारांबाबतही त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांच्याकडून माहिती घेतली.