गांधीनगर : गुजरात राज्‍यातील बहुतांश भागात आजही दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्‍या ठिकाणी मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी सरकारने एक परिवर्तनवादी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मैला वाहून नेणार्‍या व्यक्तींना मंदिरांचे पुजारी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना हिंदू रीतीरिवाजानुसार विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून ते सर्व धार्मिक विधी आणि कर्मकांडाचे सोहळे पार पाडू शकतील. 
      एका इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २0१३-१४ च्या बजेटमध्ये २२.५0 लाखांचा निधी निर्धारित केलेला आहे. याचे विशेष प्रशिक्षण १६ भागवत पीठे आणि सोमनाथ संस्कृत विद्यापीठसारख्या संस्थांतून दिले जाणार असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'नवसृजन' या दलित अधिकार संघटनेच्या मंजुळा प्रदीप यांनी सरकारचे हे पाऊल परिवर्तनकारी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने उचललेल्या या नव्या पावलामुळे ओबीसी समाजातील मोदींना देशभरातील दलितांकडून पाठिंबा मिळणार आहे. समाजातील दलित-ओबीसी लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला पंतप्रधान बनवावे, असा दावा मायावतींनी केलेला होता. यामुळेच मोदींनीही आपण दावेदार असल्याचे दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, असा तर्क लढविला जात आहे.
 
Top