नळदुर्ग -: शिक्षणाला नैतिक अधिष्ठान मानून ध्येय प्राप्तीसाठी उंच भरारी मारण्यासाठी विद्यार्थ्यानी परिश्रम करणे गरजेचे आहे, असे मत माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांनी व्यक्त केले.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयात दिवंगत शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांच्या जयंतीनिमित्त बाभळगावकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गुणवंताच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात शालेय व महाविदयालयीन यशस्वी विदयार्थ्यांचा प्रतिष्ठानच्यावतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सहसचिव प्रभाकरराव नळदुर्गकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र बोरगांवकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी पाटील, सचिव किशोर साळुंखे, संचालिका सुचिता हराळकर, वर्षा पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.    
यावेळी बोलताना नरेंद्र बोरगांवकर म्हणाले की, गरीबांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहचावी, हा विचार करुन आम्ही ही संस्था उभी केली. 1962 ला लावलेल्या या रोपटयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्याचा फायदा विदयार्थ्यांनी घेऊन जिवनामध्ये यशस्वी वाटचाल करावी. आज एकमेकांबददल प्रेम, जिव्हाळा, आदर राहिलेला नाही. त्यामुळे माणुसकी नष्ट होत चालली आहे. माणूस निर्माण करण्याचे काम होणे गरजेचे आहे.
यावेळी ज्ञानेश्वरी संभाजी पाटील या विदयार्थीने दिवंगत बाभळगांवकर यांच्या जीवनावर एक कविता सादर केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जे.एस. मोहिते, गटशिक्षणाधिकारी सविता भोसले, संभाजी भोसले, उपनगराध्यक्ष शहबाज काझी, नगरसेवक कमलाकर चव्हाण, प्रभाकरराव नळदुर्गकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक लिंबराज कोरेकर, ॲड. प्रदीप मंटगे, उपप्राचार्य एन.एम. माकणे, प्रा.डॉ. उमाकांत चनशेटटी, प्रा. एस.व्ही. चंदनशिवे, डॉ. समीर पाटील यांच्यासह महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी तर आभार प्रा. नेताजी बिराजदार यांनी मानले.
 
Top