
सरोजा रत्नाकर देशमुख (वय २१, रा.काटी, ता.तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सरोजा ही सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधील एमबीएच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होती. सोलापूर-पुणे रस्त्यावरील सिंहगड शिक्षण संकुलातील वसतीगृहामध्ये (रूम नंबर १०४) मध्ये चार मैत्रिणींसोबत राहात होती. गुरुवार रोजी एमबीएच्या फस्ट सेमीस्टरचा निकाल जाहीर झाला. सरोजा दोन विषयात नापास झाली होती. शुक्रवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास रुममधील मैत्रिणी कॉलेजला गेल्या. ती रुममध्ये एकटीच होती. त्यानंतर तिने बाथमरुमधील पाइपला ओढणीने गळफास घेतला. दुपारी 1 च्या सुमाराला मैत्रिणी वसतीगृहाकडे परतल्या. त्यांच्या रुमचे दार आतून बंद होते. बराच वेळ दार ठोठावल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी बाथरुमच्या खिडकीतून आत पाहिले. त्यानंतर त्यांना सरोजाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्यांनी वसतीगृह अधिकारी, एमबीए विभागाचे संचालक डॉ. प्रा. राजशेखर येळीकर, सिंहगडचे जनसंपर्क अधिकारी अनिल विपत यांना सांगितला. फौजदार चावडी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर साहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप चौगले, पोलिस निरीक्षक चंद्रकांत शिंदे व त्यांचे पथक आले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. संजीवनी जाधव यांनी फौजदार चावडी पोलिसात खबर दिली आहे. पुढील तपास फौजदार दत्तात्रय शिंदे तपास करीत आहेत. दरम्यान, सरोजाच्या आत्महत्येचे वृत्त समजताच काटी गावात शोककळा पसरली होती. ही घटना कळल्यावर नातेवाइक सोलापुरात आले. सरोजाचे वडील शेतकरी आहेत. आई गृहिणी आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर मूळगावी नेण्यात आला.