नवी दिल्‍ली -: जैश-ए-मोहम्‍मदचा दहशतवादी आणि संसदेवरील हल्‍ल्‍याचा दोषी अफजल गुरु याला आज सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्‍यात आली. त्‍याला फाशी दिल्‍यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच उशिर झाला परंतु न्‍याय झाला, अशा प्रकारच्‍या प्रतिक्रीया व्‍यक्त करण्‍यात येत आहे. अफजल गुरुला तिहार तुरुंगातच दफन करण्‍यात येणार आहे. मृतदेहावर अद्याप कोणीही दावा केलेला नाही, अशी माहिती देण्‍यात आली आहे.
        तुरुंग प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, अफजल गुरुला फाशी देणार असल्‍याची माहिती कालच दिली होती. तो रात्रभर झोपला नाही. त्‍याने केवळ पाणी पिले. तो जेवला नाही. त्‍याने कुरण शरीफ मागितले. त्‍यानंतर त्‍याला ते देण्‍यात आले.
         अफजलने डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला केला होता होता. त्यात दिल्‍ली पोलिसांचे ५ कॉन्‍स्‍टेबल्‍स, सीआरपीएफची एक महिला कॉन्‍स्‍टेबल, संसदेचे दोन कर्मचारी आणि एका उद्यान कर्मचा-याचा मृत्यू झाला होता. या हल्‍ल्‍यात एक पत्रकारही जखमी झाला होता. परंतु, त्‍याचाही काही दिवसांपूर्वी मृत्‍यू झाला. सुप्रीम कोर्टाने अफजल गुरुला २००५ मध्‍येच फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्‍यानंतर त्‍याने राष्‍ट्रपतींकडे दया याचिका केली होती. तिहार तरुंगात अफजल गुरुला फासावर लटकवण्यासाठी जल्‍लाद नव्हता. त्यामुळे जल्‍लादला बाहेरून बोलावण्‍यात आले होते.
       या पार्श्वभूमीवर जम्‍मू-काश्मिरात हायअलर्ट जारी करण्‍यात आला आहे. श्रीनगरमध्येही अघोषित कर्फ्यू लावण्यात आला आहे. दिल्लीतही महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
      अफजल गुरुला तिहारमध्‍येच दफन करण्‍यात येणार आहे. कोणीही त्‍याच्‍या मृतदेहावर अद्याप दावा केलेला नाही. त्‍याला फाशी देण्यात आल्याच्या वृत्ताचे देशातील जनतेने स्वागत केले आहे. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रीया दिली. 'देर आये, दुरुस्‍त आये', असे ट्विट त्‍यांनी केले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासदंर्भात प्रतिक्रीया देताना दहशतवाद्याला फाशी दिल्‍याचे स्‍वागत केले. सरकारला जनमताचा विचार करुन निर्णय घ्‍यावाच लागला. हा दहशतवाद्यांसाठी कठोर संदेश आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
        शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्‍हणाले, सरकारचे आम्‍ही अभिनंदन करतो. फाशीला उशीर झाला. त्‍याला खरे तर आपण पोसत होतो. राष्‍ट्रपतींचे विशेषतः अभिनंदन करतो. त्‍यांनी कसाब आणि अफजल यांना फाशी देण्‍याचा निर्णय घेतला.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top