सांगोला (राजेंद्र यादव) :  सोलापूर जिल्हा बॅँक तीन लाख रुपये कर्ज शून्य टक्के दराने देते. पण त्यासाठी शेतकर्‍यांनी नियमितपणे कर्ज फेडले पाहिजे. विविध विकास सोसायट्यांनी अनिष्ठ तफावतीमधील सोसायट्यांवर लक्ष देऊन त्या सोसायट्यांचे व्यवहार सुरळीत करावेत. सोसायट्यांचे केडरला  कोटी रुपये मिळाले आहेत. त्याबाबत संचालक मंडळ बैठकीत विचार केला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा बॅँकेचे ज्येष्ठ संचालक सुधाकरपंत परिचारक यांनी केले.
       सांगोला तालुक्यातील  विकास सहकारी संस्थांनी सन २०११-१२ या सहकारी वर्षात कर्जाची १०० टक्के परतफेड केल्याबद्दल सचिव, अध्यक्ष, बॅँक अधिकार्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आ. गणपतराव देशमुख, आ. दीपकआबा साळुंखे पाटील, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे, सांगोला तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, संचालक डॉ. कांबळे, संचालिका सुनंदा बाबर, सभापती ताई मिसाळ, नगराध्यक्ष मारुती बनकर उपस्थित होते.
        पीक विम्याचे साडेसहा कोटी रुपये आले आहेत. अनिष्ठ तफावतीत सोसायटी गेल्यानंतर कर्ज मिळू शकणार नाही. यामुळे शेतकरी थकबाकीत जाणार नाहीत, याची खबरदारी सोसायटी सचिवांनी घेतली पाहिजे. कर्जे देताना भुसार पीक व फळबागा यांचा विचार करण्याची गरज आहे. केडर बरखास्तीच्या नोटिसांचा विचार केला पाहिजे, असे आ. गणपतराव देशमुख यांनी सांगितले.
       नाबार्डचे धोरण सतत बदलत आहे. सहकारावर जाचक अटी येत आहेत. विकास सहकारी सोसायट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया घातला गेला आहे. जिल्हा बॅँकेत शेतकर्‍यांच्या विकासासाठीच काम चालते. राजकारण न आणता बॅँक सक्षमपणे चालविली जात आहे. जिल्हा बॅँकेत सांगोला तालुक्यातील ठेवी जास्त पण कर्जे कमी अशी स्थिती आहे. यामुळे सोसायट्यांचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे, असे आ. दीपकआबा साळुंखे म्हणाले. यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, नाबार्डचे विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. रमेश गोडसे यांनी आभार मानले.कर्यक्रमासाठी सचिव सुकदेव नवले, जितेंद्र बनसोडे, के. बी. बनकर, भारत कोळेकर, शिवाजी बनकर, सुकदेव जांगळे, जे. आर. देशमुख यांनी परिश्रम घेतले.
 
Top