उस्मानाबाद :- दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व जनावरांच्या चारा व पाणी प्रश्नावर उपाययोजनांसाठी भूम तालुक्यातील अंभी  व हाडोंग्री गावातील गुरांच्या छावणीस भेट देऊन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  शेतक-यासमवेत  चर्चा करुन अडीअडचणी जाणून घेतल्या. 
    यावेळी बोलतांना कृषी मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनावरांच्या संगोपन व पशुधन वाचविण्यासाठी मागेल त्याला छावणी व शेततळे देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पैसा कमी पडणार नाही. तसेच निसर्गाच्या या अवकृपेचा परिणाम सर्वांवर झाला आहे. पशुधन चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी बांधवांनी या परिस्थितीला धैर्याने तोंड देत असल्याबद्दल समाधान व्यक्त  केले.
     याप्रसंगी शेतकरी व पशुपालक यांचे म्हणणे  ऐकून घेतले व तातडीने तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
    छावणीची पाहणी करतांना तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता चाऱ्याची कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच छावण्या उभारण्यासाठी लोकांनी पुढे यावे, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. निधीचे वाटप विहित मुदतीचे करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
    दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी दुधाचे संकलन,आणेवारी, शेतक-यांना अनुदान वाटप, चारा वाढविणे अशा विषयांवर चर्चा करुन शेतक-यांची फसवणूक होणार नाही, याची  काळजी घेतली जाईल,असे  कृषी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
     कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चारा उत्पादन करण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात हाडोंग्री येथील ५ शेतक-यांना मोफत मका बियाणे वाटप करण्यात आले. तसेच केंद्रीय भूसंधारण विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत हाडोग्री गावातील कंपार्टमेंट बंडीग कामाचे उदघाटन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.           यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे,अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, कृषी आयुक्त उमाकांत दागंट, जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार अहिल्या गाठाळ, कृषी संचालक आनंदराव जावळे, विभागीय कृषी संचालक कृष्णा देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चंदेल, तालुका कृषी अधिकारी नाईकवाडी तसेच संबंधित अधिकारी, शेतकरी तसेच पशुपालक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top