
हरिदास मस्के (वय ५५ वर्षे, रा.भिमनगर, बार्शी) या नराधमाने बार्शी एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील इयत्ता तीसरीच्या चार मुलींचा विनयभंग केल्याची घटना बार्शी पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर पालकांमध्ये तीव्र निषेधाच्या भावना जागृत झाल्या.
शनिवार सकाळी नऊ पासून पालकांनी शाळेच्या आवारात येऊन शिक्षक व संचालकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यानंतर हळूहळू पालकांची गर्दी होत शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करवा लागला. सदरच्या घटनेबाबत तातडीने पावले उचलत शिवसेना व मनसेच्या पदाधिकार्यांनी संस्थेच्या संचालकांना सदरच्या निंदणीय व घृणास्पद प्रकाराबाबत जाब विचारला तसेच बार्शी पोलिसांना निवेदन देण्यात दिले. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात आरोपींवर ३७६ व ५११ नुसार कार्यवाही करण्याचे तसेच संबंधीत संस्थेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नमूद केली आहे. मनसेच्या वतीने केलेल्या मागणीत सोलापूर सिव्हील मध्ये पिडीतांची वैद्यकीय तपासणी करण्याचे तसेच ३७६ व ५११ कलमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर बार्शीत अशा प्रकारच्या घटना इतरही संस्थेंच्या शाळेत होत असूनही पिडीत मुलींना दमदाटी करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे व मुलींना संरक्षण मिळत नसल्याने सदरच्या प्रकारांत वाढ होत असल्याचे म्हटले आहे.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा सचिव सोमनाथ पेठकर, जिल्हाध्यक्ष शकील मुलाणी यांनी शाळेतील वातावरणाची पाहणी करुन उपाययोजनेसाठी सूचनांचे पत्र मुख्याध्यापकांना देत १५ दिवसांच्या आत उपाययोजना न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी चिलवंत यांनी संस्थेस भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालकांनी सर्व घटनांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहाराचे अन्न मोकळ्या मैदानात घाणीमध्ये शिजिवण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आणले. त्यांच्यासमक्ष विद्यार्थ्यांनी बाहेर मैदानात बसून त्याचा आस्वादही घेतला. तर मुलींच्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याचे दिसून आले.
यावेळी चिलवंत यांनी सदरचा प्रकार हा मला वृत्तपत्रातून समजल्याचे सांगून संबंधित संस्थेच्या पदाधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, तसेच चौकशी करुन चौकशी अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे सांगितले.
सदरच्या घटनेची दखल संस्थेच्या वतीने घेत पोलिसांत लेखी तक्रार करण्याचा आग्रह पालकांनी केला. यावेळी जमा झालेल्या गर्दीची खबर मिळताच पोलिसांची एक तुकडी सदरच्या संबंधित संस्थेकडे दाखल झाली.
सदरच्या संस्थेविरुध्द पालकांनी आजपर्यंत होणार्या गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी केल्या परंतु संस्थाचालक व शिक्षकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सदरचा प्रकार हा डोळेझाक करण्याचा नसल्याने पालकांचा असंतोष भडकला व सदरच्या इसमाला आमच्या ताब्यात द्या आम्ही काय करायचे ते त्याचे करु तसेच त्याला पांडे चौकात फाशी द्या अशा मागण्याही पालकांनी केल्या.
सदरच्या घटनेची संस्थेच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पालकांनी संस्थेच्या संचालक व शिक्षक, मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन चालत बार्शीतील प्रमुख मार्गावरुन धिंड काढली व संस्था तसेच संचालकांच्या विरोधात धिक्काराच्या तीव्र घोषणा दिल्या. सदरच्या प्रकारानंतर पालकांनी संस्थाचालकांना पोलिस ठाण्याच्या आवारात आणल्यावर महिला पोलिसांनी त्यांची तक्रार तसेच तीव्र भावना ऐकून वरिष्ठांना कळविले. यावेळी पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले यांनी सदरच्या घटनेबाबत आपण संस्थेच्या अध्यक्ष, पालक, पीडित यांच्या बैठकीचे आयोजन करुन वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगीतले.