उस्मानाबाद -: शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  शिक्षकांनी उत्तम व दर्जेदार शिक्षण  दयावे. भावी पिढी सुसंस्कारीत करुन उत्तम नागरीक घडवावे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
    उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथल श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचा समारोप व सारथी रौम्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशनप्रसंगी दर्डा  बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण,खासदार डॉ. पदमसिंह पाटील, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हटटे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राघवेंद्र  शाईवाले, उमरगा पंचायत समितीचे सभापती अक्षरताई सोनवणे, उपसभापती श्री. काझी, शिक्षण  संचालक सहस्त्रबुध्दे, उपसंचालक अरुण व्हटकर, तहसीलदार शोभा जाधव, शिक्षणाधिकारी जाधव आदि उपस्थित होते.
    शिक्षणमंत्री दर्डा पुढे म्हणाले की, सध्या राज्याने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता साधली असून भारत देश सन २०२० मध्ये महासत्ता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला. शैक्षणिक क्षेत्रात मराठवाड्यात अंबेजोगाई व उमरगा तालुक्याने उंच भरारी घेवून शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक मिळविला असल्याचे आवर्जुन उल्लेख केला. सध्या राज्यात पहिली ते बारावीपर्यंच्या  एक लाख शाळा असून त्यातून दोन कोटी विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असल्यची माहिती दिली. शिवाय ३ हजार शाळांना प्रयोग शाळेची मंजूरी देण्यात आली असल्याचे नमूद करुन  शिक्षकांचे प्रश्न, जादा तुकडयाना मंजूरी, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न आपण सहानूभूतीपुर्वक आग्रहाने  सोडवू, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.
        या आपल्या अध्यक्षपदावरुन बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या संस्थेनी स्वातंत्र्यपुर्व काळात कठीण परिस्थितीत अनेक हाल अपेष्टा सोसल्या. विना अनुदान कशाचीही अभिलाषा न बाळगता अहोरात्र शैक्षणिक उपक्रम राबवून ज्ञानदानाचे काम केल्याने आज ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगितले.
      जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की श्रीकृष्ण शिक्षण संस्था गुंजोटी या शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुले केल्याने ती संस्था आज वटवृक्षासारखी फोफावली असल्याचे सांगून या शाळेने अनेक होतकरु, हुशार, उत्तम अधिकारी प्रशासनास दिले असल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
    खासदार डॉ. पद्मसिंह पाटील म्हणाले की, गुंजोटी येथील संस्थेनी प्रतिकूल परिस्थितीत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून ऐतेहासिक वारसा जपल्याचे नमुद केले. आमदार ज्ञानराज चौगुले व विक्रम काळे यांनी राज्य शासनाने शिक्षण सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविल्याबददल त्यांनी शासनाचे आभार मानले.
    संस्थेचे सचिव दामोधर पतंगे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य शेषेराव पवार  यांनी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन समाज परिवर्तनाचे कार्य करत असल्याचे नमूद केले व  संस्थेनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.
    यावेळी श्री. दर्डा यांच्या हस्ते  श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन केले तर शालेय विद्यार्थ्यांनी संस्थागीत प्रमुख पाहूण्यासमोर सादर केले.
     या कार्यक्रमास श्रीकृष्ण शिक्षण संस्था विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी, शिक्षणप्रेमी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, विविध सेवा सोसायटीची सदस्य,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध  संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ , विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top