सांगोला (राजेंद्र यादव) -:  छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या भव्य सायकल व मोटारसायकल रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ या घोषणांनी शहरातील वातावरण अवघे शिवमय झाले होते. प्रचंड अशा घोषणांनी सांगोला शहर दुमदूमून गेले. या मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी आपल्या गाड्यांना भगवे झेंडे बांधून शहरातून शिस्तबध्दपणे रॅली यशस्वी केली. या रॅलीची सुरवात नगराध्यक्ष मारूतीआबा बनकर यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी शिवाजी चौकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरात सगळीकडे भगवे झेंडे व छ. शिवरायांना मानाचा मुजरा घालणारी अनेक भव्य अशी डिजीटल पोस्टर्स शहरात लावली असल्याने शहर अवघे भगवे झाल्याचे दिसत आहे.
     जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 18 फेबु्रवारी रोजी सायंकाळी श्री च्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
    दि. 20 रोजी शाहीर आदिनाथ बापूराव विभूते (बुधगांव) यांच्या बहारदार पोवाड्यांचा कार्यक्रम सायं. 7 वाजता होणार आहे. दि. 21 रोजी सायंकाळी 7 वाजता मुलूखमैदानी तोफ प्रा. नितीन बानगुडे पाटील (रहिमतपूर-सातारा) यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 22 रोजी सकाळी 9 ते 6 पर्यंत भव्य रक्तदान शिबीर,मोफत रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी, शिबीर होणार आहे. दि.23 रोजी सायंकाळी 7 वाजता आकार प्रस्तुत ‘अंतरंग’ मराठमोठा रंग वेगळा, कोल्हापूर यांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
     दि.25 रोजी छ. शिवरायांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा घोडे, उंट, सजीव देखावे, दांडपट्टा, तलवार(सातारा), लेझिम, हलगी, नाशिक ढोल, डॉल्बी, नृत्यपथक (शिवकालिन) अशा विविध कार्यक्रमांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top