उस्मानाबाद -: ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि मातीशी नातं सांगणा-या साहित्याची निर्मिती करणाऱ्या जिल्हयातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार आज ग्रंथोत्सव उपक्रमात करण्यात आला. निमित्त होते, मराठी राजभाषा दिनाचे!
       राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य  व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ग्रंथोत्सव-2013 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमास उस्मानाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सभागृहात दि. 26 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या उपक्रमात आज जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, भ. ना. कदम, शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी आणि भारत गजेंद्रगडकर यांचा ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, लोकराज्य मासिकाचा मराठी राजभाषा दिन विशेषांक देऊन गौरव करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, नगरवाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
       यावेळी आपल्या भाषणात कारखानीस यांनी ज्येष्ठ लेखकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लोकांना साहित्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.  ज्येष्ठ लेखकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्वाचे आहे. ग्रामीण भागात राहून साहित्याची सेवा करणे आणि वाचकांपर्यंत मातीशी नाळ सांगणारे साहितय् पोहोचवणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेतील वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, रणजीत देसाई, शिवाजी सावंत या ज्येष्ठ लेखकांच्या साहित्यिक वाटचालीच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या.
         लेखकांच्या वतीने प्रा. वेदालंकार यांनी आपले मनोगत मांडले. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. तिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. आपल्या साहित्याची नोंद घेतली जाईल की नाही याची खंत न बाळगता नवीन लेखकांनी लिहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तावडे यांनी राज्य शासन ग्रंथ प्रसार आणि प्रचारासाठी करत असलेल्या कामाबद्दल कौतुकोद्गार काढले.
         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. चव्हाण यांनी मराठी राजभाषा दिन आणि त्यानिमित्त आयोजित या ज्येष्ठ लेखकांच्या सत्कारामागील भूमिका समजावून सांगितली. आभार अर्जुन परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवीवर्य सुरेश भट यांचे कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी अभिमान गीताचे सादरीकरण करण्यात आले.
 
Top