सांगोला (राजेंद्र यादव) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयातील अधिकार्‍यांकडून श्री अंबिकादेवी यात्रेकरिता परजिल्हा, पर तालुक्यातून यात्रेनिमित्त आलेल्या व्यावसायिकांची वीज जोडणीसाठी अडवणूक करण्यात येत असल्याबाबत व्यापार्‍यांनी थेट ऊर्जामंर्त्याकडे लेखी निवेदन दिले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या या मनमानीची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
     महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सांगोला येथील श्री अंबिकादेवी यात्रेसाठी बाहेरगावचे व्यापा-यानी मेवा मिठाई, खेळणी, स्टेशनरी, भांडी, वडापाव, चायनीज आदी दुकाने थाटण्यासाठी साहित्य आणले आहे. त्याचबरोबर पाळणे, लहान मुलांचे मनोरंजनाचे साहित्य, हॉटेल, पायनापल ज्युस, बचतगट, कृषीची दुकाने यासह विविध स्टॉल सुरू करण्यासाठी मोठया प्रमाणावर राज्यातील वेगवेगळ्या भागातून व्यापारी आले आहेत. प्रत्येक वर्षी व्यापारी आपल्या जागेत तात्पुरती वीज कनेक्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे डिपॉझीट भरून लाईट सुरू करतात व यात्रा संपण्यापूर्वी ज्या व्यापार्‍यांचे कोटेशनपेक्षा जास्त वीज वापरली त्यांचे पैसे भरून घेऊन त्यांची कनेक्शन कट करून मीटर काढून घेऊन जातात. परंतु, ज्या व्यापार्‍यांचे कोटेशनपेक्षा कमी वीज जळाली त्यांना मात्र कोटेशन भरल्याचे पैसे परतच दिले जात नाहीत. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत प्रत्येक वर्षी कोटेशन भरलेल्या व्यापा-यांचे कंपनीकडे येणे असलेले पैसे अनेकवेळा मागणी करूनही परत दिले जात नाहीत. प्रत्येक वर्षी व्यापार्‍यांकडून वापरलेल्या रिडिंगची आकडेवारी घेतल्यानंतर उर्वरित पैसे भरूनही २००७ पासून काही व्यापार्‍यांकडे बाकी निघाल्याचे निमित्त करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अडवणूक करतात तर काही व्यापार्‍यांकडून जादा कोटेशन काढून हजारो रूपये अर्थपूर्ण वाटाघाटी केल्याशिवाय कोटेशन भरून घेतले जात नाही व कनेक्शनसाठी अडवणूक करतात. अर्थपूर्ण वाटाघाटी केल्याशिवाय व्यापार्‍यांची कोटेशन व कनेक्शन जोडत नसल्याने बाहेरगाहून आलेल्या व्यापार्‍यांनी सांगोला शहराच्या कनिष्ठ अभियांत्याविरूद्ध राज्याच्या ऊर्जामत्र्यांकडे व संबंधीत अधिकार्‍यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
 
Top