सोलापूर : जिल्ह्यातील ज्या भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्याठिकाणी चारा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागामध्ये उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतक-यांकडे चारा पिके घ्यावयाचे आहे त्यांना किमान १ एकर (०.४० हे.) व जास्तीत जास्त ५ एकर पर्यंत अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा शेतक-यांनी गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून ते किती क्षेत्रावर चारा पिकाचे उत्पादन घेऊ इच्छितात याबाबतचा अर्ज दिनांक १५ फेब्रुवारी २०१३ पर्यंत द्यावा, उत्पादित केलेला चारा शेतक-यांनी प्राधान्याने जनावरांच्या छावणीला विकणे बंधनकारक असेल. चारा पिकांचे संकरित मका, कडवळ (ज्वारी) ही बियाणे अनुदानावर शेतक-यांनी उपलब्ध करुन देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा व टंचाई परिस्थितीत चारा पिकाचे उत्पादन घेण्यात यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
                    
खते विक्रेत्यांना आवाहन
सोलापूर -: केंद्र शासनाकडून खत कंपन्यांना मिळणारे अनुदान यापुढे थेट खत विक्रेत्यांनाच देण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक विक्रेत्यांनी आपल्या खत विक्री परवान्याची नोंद खत संनियंत्रण प्रणाली (MFMS) मध्ये करुन घेणे गरजेचे आहे.
         ज्या खत विक्री परवान्याची नोंद MFMS प्रणालीमध्ये करण्यात आली नाही त्यांनी राष्ट्रीय केमिकल अन्ड फर्टिलायझर, भोसले चौक, दाळे गल्ली, पंढरपूर येथील कार्यालयात करुन घ्यावी. खत विक्री परवान्याची नोंद MFMS मध्ये करुन घेणेसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्र सादर करावीत. विहीत नमुन्यात फॉर्म, परवाना झेरॉक्स, पॅन झेरॉक्स, मोबाईल नंबर, कोअर बँकिंग असलेल्या बँकेत खाते उघडलेल्या पासबुकची झेरॉक्स इ. कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. खत विक्री असलेल्या बँकेत खाते उघडलेल्या पासबुकची झेरॉक्स इ. कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. खत विक्री परवान्याची नोंद MFMS मध्ये करुन घेऊन आयडी नंबर व खत विक्री परवाना झेरॉक्ससह अहवाल संबंधित तालुक्याच्या खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी, पंचायत समिती तसेच परवाना अधिकारी तथा कृषि विकास अधिकारी, जि.प. सोलापूर कार्यालयास त्वरित सादर करावा. जे खत विक्रेते दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत MFMS प्रणालीमध्ये नोंद करुन अहवाल सादर करणार नाहीत त्यांचे खत विक्री परवाने रद्द करण्यात येतील याची जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जि.प. सोलापूर यांनी केले आहे.
 
Top