उस्मानाबाद -: कधी मनाचे अंतरंग उलगडून दाखविणारी तर कधी आत्ममग्न करायला लावणारी, कधी अल्लड वा-याप्रमाणे हितगूज करणारी तर कधी उपहासातून सद्यस्थिती मांडणारी कविता ग्रंथोत्सवात रसिकांना भेटली अन या कवितांनी रसिकांना अक्षरश: कवितेच्या गावाची सफर घडवून आणली. निमित्त होते, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ग्रंथोत्सव उपक्रमाचे! जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या कवितांनी मंगळवारची सायंकाळ काव्यमय केली.
          येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सभागृहात दि. 26 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या ग्रंथोत्सवात काव्यसंध्या कार्यक्रमाने अक्षरश: रंगत आणली. यात माधव गरड, राजेंद्र अत्रे, बालाजी इंगळे, डी.के. शेख, सुभाष चव्हाण, देवीदास पाटील, प्रा. हनुमंत काळे,  शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे, सतीश मडके, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने, डॉ.विजय परदेशी यांनी आपल्या कविता सादर केल्या.  काव्यसंध्येचे सूत्रसंचलन कवी रवींद्र केसकर यांनी केले.
    मराठी भाषेचे महत्व माधव गरड यांनी ‘अंतरीचा उमाळा मी मराठीत सांगतो’ या शब्दात व्यक्त केले तसेच बालाजी इंगळे यांच्या रान नभात या कवितेतील ‘पायाखाली तुडवून अंधार सूर्य घेऊन फिरतो’ या भावनांनी उपस्थितांनाही विचार करावयास भाग पाडले. ‘ती हसली की मी ही हसतो, हे काळीज अख्खे तिला अर्पूण बसतो’ या डी.के. शेख यांच्या कवितेने रसिकांना मनमुराद हसविले. बदलत्या वातावरणाचे आणि त्याच्या परिणामांची यथार्थ वर्णन करणारी सुभाष चव्हाण यांची ‘ आमच्या बापजन्मी माहित नव्हतं असं आता ऊन पडलंय’ ही कविताही दाद घेऊन गेली. गर्द पानातही अबोल हाक देणारी भाग्यश्री वाघमारे यांच्या गेय कवितेने वातावरणात संगीतमय जान आणली तर युवराज नळे यांच्या ‘पोरा असं कसं झालं’ या कवितेने आणि ‘सारीच गर्दी शिकाऱ्यांची, नेमका कदरदान कोण?’ गझलने वाहवा मिळविली.
        कळंबचे कवी सतीश मडके यांनी ‘ती घरी नसताना’ प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारी कविता रसिकांसमोर ठेवली. पंडीत कांबळे यांची क्रांतीची बीजे ही कविताही दाद घेईन गेली. उमरग्याचे कवी प्रमोद माने धाकट्या बहिणीचे भावविश्व सांगणारी आणि भावाच्या भावनांचा काव्यमय पट उलगडणारी कविता सादर केली. वाशी येथील प्रा. हनुमंत काळे यांची ‘खरंच बापू देशासाठी तुम्ही परत याल का’ अशी सद्यस्थिती दाखविणारी आणि काळातील बदलत्या विश्वाचे भान सांगणारी कविता रसिकांना ऐकवली. विजय परदेशी यांची ‘बरं झालं देवा’ आणि ‘पटलं तर ऐका’ या कवितांनाही रसिकांनी चांगली दाद दिली. प्रा. शेखर गिरी यांच्या ‘ती अशी हातातून सटकून जाते, प्रीत माझी अशी भटकून जाते’ असं तरूणाईच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले. प्रा. देवीदास पाटील यांनी आपल्या कवितेतील सामर्थ्यशाली शव्दांचा परिचय रसिकांना करुन दिला. रवींद्र केसकर यांनी आपल्या बहारदार शैलीत सूत्रसंचलन केले. त्यांच्याच ‘पत्र शेवटचे लिहितो आई’ या कवितेने रसिकांना धीरगंभीर वातावरणात नेले आणि काव्यसंध्येचा समारोप झाला.

ग्रंथोत्सवाचा उद्या गुरुवारी समारोप
उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचा समारोप दि. 28 रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून प्रसिध्द लेखक-वक्ते प्रा. मिलींद जोशी यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
         ग्रंथोत्सव उपक्रमात सुरु असणारे ग्रंथप्रदर्शन रात्री 9 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. सर्व रसिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.             
 
Top