मुंबई : राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य विभागाचा बृहतआराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 हजार 257 नवीन आरोग्य संस्था निर्माण करण्यात येणार आहेत,असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
    सह्याद्री अतिथीगृहातील यशवंतराव चव्हाण सभागृहात काल डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
      उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, स्त्री आणि जिल्हा रुग्णालये, सेवाभावी खासगी संस्था तसेच डॉक्टर यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून
         डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नव्याने आरोग्य संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सुमारे 1 हजार 916 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नवीन पदे देखील निर्माण केली जाणार आहेत. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील.
    आठ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत
        38 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ह्या योजनेची व्याप्ती पाहता लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सातारा येथे अलिकडे शुभारंभ करण्यात आलेली जीवन अमृत सेवा प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविली जाणार आहे. काही महिन्यांच्या कालावधीत ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आरोग्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहीला असून आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासन हाती घेणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी ही योजना असणार आहे. केंद्र शासनाने शहरी आणि ग्रामीण भागात ही योजना सुरू करण्यास मान्यता दिल्याने लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात येईल. राजमाता जिजाऊ मिशनच्या माध्यमातून राज्याने कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
    आरोग्यमंत्री श्री. शेट्टी म्हणाले, रुग्णांना दर्जेदार व शाश्वत आरोग्य सेवा देण्यासाठी विभागाने विविध महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून राज्यातील माता मृत्यू आणि बाल मृत्यूचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. एनआरएचएमच्या माध्यमातून राज्याने देशात अग्रेसर राहून यशस्वीरित्या योजनांची अंमलबजावणी केल्यामुळे केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रासाठी 37 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे. राज्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच नवीन पदांची निर्मिती देखील करण्यात आली आहे, असे सांगून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाने गेल्या तीन वर्षात यशस्वीरित्या राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली.            
    ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असून त्याचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलेली शाबासकीची थाप आहे, असे राज्यमंत्री फौजिया खान यांनी यावेळी सांगितले.
    कार्यक्रमास आरोग्य विभागाच्या सचिव मिता राजीव लोचन, एनआरएचएमचे प्रकल्प संचालक विकास खारगे, सहसंचालक डॉ. सतिष पवार आदींसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी प्रास्ताविक केले.
 
Top