बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर)  : मुकी जनावरे, शेतकरी, सामान्य जनता ही पाण्यावाचून होरपळून जात आहे आणि बार्शीचे आजी-माजी आमदार हे बाया नाचवून करोडो रुपयांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी केला.
     बार्शीतील जुन्या पोलिस स्टेशनजवळ झालेल्या शिवबसव भिमशक्ती हमाल माथाडी जनरल कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक आंधळकर, रामभाऊ जगदाळे, खजिनदार विजूखुडे, सतीश सोनवणे,  पिंटू नाईकवाडी, कृष्णा चव्हाण, मंगलताई पाटील, मनीषा विभूते, माऊली पवार, दिगंबर कानगुडे आदीजण उपस्थित होते.
     पुढे बोलतांना आंधळकर म्‍हणाले की, आजपर्यंत 4500 माथाडी कामगारांनी आमच्या संघटनेत नावे नोंदविली असून मार्केट यार्डातील हमाल, तोलार, कामगार, रिक्षा वाहतूक कामगार, कामगार तळ, दुकानातील कर्मचारी, मंडप कामगार, फोटोग्राफर, बँक, पतसंस्था, हॉटेल, दवाखाने इ. सर्वस्तरातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमची संघटना काम करत आहे.  अधिकृत नोंदणी असलेल्या संघटनेच्या कामगारांनाच काम देणे कायद्याने बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रथम निवेदने दिली जातील यानंतर त्यांच्या हक्कासाठी लढा उभारला जाईल. असे सांगून ते    पुढे म्हणाले, सर्वहिंदूचे श्रध्दास्थान असलेल्या श्री शिवछत्रपतींनी सुबेदाराच्या स्त्रीबद्दल काढलेले चांगले उदगार हे सर्वांना आदर्श असतांना त्यांच्या शिकवणुकीचा आजी-माजी आमदारांना विसर पडलेला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्‍त बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी काढलेल्या मिरवणुकीत तमाशातील बाया नाचवल्या व तरुणांना दारु पाजून शहरातील व्यापार्‍यांना वेठीस धरले. तर चालू आमदार गावाबाहेर तमाशातील बाया नाचवत आहे. तीन वर्षे शिवजयंतीकडे दुर्लक्ष करणारांनी आगामी 2014 च्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन साजरी केली जाणारी शिवजयंती मिरवणुक ही त्यांचा नाटकी पुळका असून जनतेच्या प्रश्नासाठी त्यांना कसलेही देणे घेणे नाही.     आमची कामगार माथाडी संघटना ही भूमिपुत्रांची असून कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी बार्शी तालुक्यातील पोलीस उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक या सर्वांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
 
Top