उस्मानाबाद -:  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  दिनांक 26  ते 28 फेब्रुवारी या कालावधीत  उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांतर्गत बुधवार, दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता मराठी राजभाषा दिनानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार आणि सायंकाळी 6-30 वाजता आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
       दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस आणि दैनिक संघर्षचे संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या हस्ते मराठी राजभाषा दिनानिमित्त सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार केला जाणार आहे. यात वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, श.मा. पाटील, भ.ना.कदम, शिवमुर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, योगीराज वाघमारे, भारत गजेंद्रगडकर या ज्येष्ठ लेखकांचा समावेश आहे. या कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुनील हुसे आणि नगर वाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        याचदिवशी सायंकाळी 6-30 वा. आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उस्मानाबाद आणि तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनुक्रमे डॉ. वैशाली कडुकर आणि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कमलताई आवटे, भूम आणि परंडा येथील तहसीलदार अनुक्रमे अहिल्या गाठाळ आणि वैशाली पाटील, उस्मानाबाद आणि तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अनुक्रमे प्रियदर्शिनी मोरे आणि तृप्ती ढेरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.    
 
Top