मानवी मूल्य जपणा-या साहित्याची गरज : प्रा. चंदनशीव
उस्मानाबाद -: सध्याच्या काळात माणसाची नाती-गोती आणि वाचन संस्कृती दुरापास्त होत चालली आहे. अशावेळी मानवी मुल्याची जपणूक व जिव्हाळा निर्माण करणाऱ्या साहित्याची गरज आहे,   असे प्रतिपादन  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांनी केले.
       राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य  व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2013 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे आणि प्रा. चंदनशीव यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास प्रमुख पाहुणे म्हणून तर  मराठवाडा विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी अध्यक्षस्थानी होते. उस्मानाबाद मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची  व्यासपीठावर उपस्थिती होती. 
       यावेळी प्रा.चंदनशिव यांनी आपल्या भाषणात साहित्याची मानवी जीवनाला असलेली निकड स्पष्ट केली. जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी ही नोकरीसाठी आवश्यक असणारी भाषा ठरत असताना मातृभाषा ही सर्वांगीण जीवन विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या ग्रंथांचे, पुस्तकांचे वाचन हे विकासासाठी आवश्यक असून संत तुकाराम महारांजांची गाथा आणि महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या मनाची भाषा बोलतात, असे प्रा. चंदनशीव  यांनी नमूद केले.
     आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी साहित्यातील बदलत्या प्रवाहाविषयी उहापोह केला. त्यातही ग्रामीण साहित्याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातील गतीमान प्रगतीमुळे सर्वसामान्य माणसाची धावपळ होत आहे. अशावेळी अक्षराच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम ग्रंथ करत असतात. वाचन लेखनामुळे वेगवेगळया संस्कृती निर्माण होत आहेत. साहित्य व वाचन संस्कृतीला वाव देण्यासाठी ग्रंथाची निर्मिती व बांधणी महत्वाची आहे.साहित्याची परंपरा जपण्यासाठी ग्रंथाचे निरंतर वाचन महत्वाचे आहे. प्रदर्शन व संमेलने आयोजन केल्यामुळे माणसाच्या मनातील कडवटपणा नाहीसा होण्यास मदत होते. प्रत्येक शब्द हा संस्कृती घेऊन येतो. त्यामुळे साहित्यिक नवीन भाषा निर्माण करण्याचे कार्य करत असतो. ग्रंथ वाचनातून विचारांची देवाणघेवाण वाढविण्याचे काम   ग्रंथ करत असतात. मराठी भाषा व्यापक होण्यासाठी शब्दाचा प्रवाह महत्वाचा असतो. मराठी  संस्कृती ही विविध घटकांशी निगडीत असल्यामुळे त्याचे जतन करण्याची जबाबदारी ही आपणावर आहे, असे प्रा. चंदनशीव यांनी नमूद केले.
         जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की,  ग्रंथाविषयी वाचकांना प्रेम असते. वाचनामध्ये बरेच काही शिकण्यासारखे असते. विशिष्ट विषयाची माहितीही ग्रंथामधूनच होत असते. त्यासाठी वाचकांना ग्रंथाची खरेदी एक संधी निर्माण झाली असून त्यांनी मोठया प्रमाणात   वाचन  करावे व आपल्या ज्ञानात भर घालावी. वाचनामुळे संस्कारक्षम व विचारवंत समाजाची निर्मीती होते. तेव्हा पुस्तक व ग्रंथाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी वाचन संस्कृती जोपासावी,असे आवाहन त्यांनी केले. 
          माहिती संचालक मुळी  म्हणाले की, राज्यात सर्व जिल्ह्यात हा उपक्रम सुरु आहे. वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याच्या या प्रयत्नांना वाचकांनीही सकारात्मक प्रतिसाद दयावा. गतवर्षी या तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाला सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावर्षी उस्मानाबादकर साहित्य रसिक भरभरुन प्रतिसाद देतील,अशी अपेक्षा व्यक्त करुन  ग्रंथप्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
          ग्रंथोत्सवात  दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात मराठवाडा तसेच राज्यातील इतर भागातून पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते आले आहेत. वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेटी देऊन मोठया संख्येने याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 
        प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित दुरुगकर यांनी केले तर चव्हाण  यांनी आभार मानले. या कार्यक्रमास साहित्यिक, रसिक  वाचक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                       
ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन; 22 ग्रंथविक्रेते-प्रकाशकांचा सहभाग
उस्मानाबाद -:  जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमात आज जिल्हाधिकारी ड. के. एम. नागरगोजे आणि ख्यातनाम साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, मसाप उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
         ग्रंथप्रदर्शनानंतर प्रमुख पाहुण्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. विविध स्टॅाल्सना भेटी देऊन पुस्तकांची माहिती घेतली तसेच पुस्तके खरेदीही केली.
         राज्याच्या विविध भागातून विविध ग्रंथ व पुस्तकांचे 22 स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले आहेत. यात सोलापूर येथील सुविद्या प्रकाशन,विजय प्रकाशन, विद्यादायीनी ग्रंथप्रकाशन, औरंगाबाद येथील सुमेध बुक डेपो, साकेत प्रकाशन, लोकसाहित्य प्रकाशन, लातूर येथील साईशाम पुस्तकालय, विचार सेतू, परभणी येथील पुजा ग्रंथ वितरण आणि प्रतिभास प्रकाशन, सातारा येथील लक्ष्मीनारायण एजन्सीज, पुणे येथील समकालीन प्रकाशन व ग्रंथाली प्रकाशन, औसा येथील विकास बुक सेलर्स, मुंबई येथील इस्लामीक मराठी पब्लीकेशन ट्रस्ट तसेच उस्मानाबाद येथील पृथ्वीराज प्रकाशन, ज्ञानदाता साहित्य सेवा आदि ग्रंथ विक्रेते व प्रकाशक यांत सहभागी झाले आहेत.
        विविध विषयांवरील तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे, कथा,कादंबरी, कवीताविषयक पुस्तके तसेच पर्यटन, पाककला, सौंदर्य,अशा विविध विषयांवरील पुस्तकेही या ग्रंथप्रदर्शनात वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी पुस्तकेही या प्रकाशकांमार्फत याठिकाणी विक्रीस ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे दि.28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत हे ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी खुले राहणार आहे. जिल्ह्यातील पुस्तकप्रेमी आणि रसिक वाचकांनी आवर्जून या ग्रंथोत्सवास उपस्थिती  लावावी आणि पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.           

 
Top