सोलापूर : जिल्ह्यातील बंधा-यांमधुन उपलब्ध असणारा पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच उपयोगात आणला जावा याकरिता काटकसरीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी दिल्या.
      शासकीय विश्रामगृहात आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी, छावण्या, रोहयो, रस्त्यांची कामे व दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर अलका राठोड, उपमहापौर हारुण सय्यद, आमदार गणपराव देशमुख, बबन शिंदे, सिद्रामप्पा पाटील, विजय देशमुख, दिलीप माने,भारत भालके, हनुमंत डोळस, दिपक साळुंखे, श्रीमती शामल बागल, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त अजय सावरीकर उपस्थित होते.
     बैठकीत सूचना देतांना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीसच पाण्याची स्थिती गंभीर असुन आज सुरु असलेल्या पध्दतीनेच पाणी वापर केल्यास केवळ 13 दिवसांचेच पाणी बंधा-यामध्ये शिल्लक आहे. पाणी टंचाईची भिषणता जानेवारी अखेरच सुरु झाली आहे. जूलै अखेरपर्यंत पिण्याचे पाणी व्यवस्थित पुरविण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बंधा-यांमधुन उपलब्ध असलेले पाणी काटकसर व नियोजनाने वापरले तरच पिण्याच्या पाण्याची गरज भागवता येईल. बाष्पीभवन आणि बॅकवॉटरचा वेगाने होणारा उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. सिना आणि भिमा नदीच्या बंधा-यांवर आधारित असणा-या पाणी पुरवठ्यासाठीचे पाणी सद्या उपलब्ध असून मार्च महिन्यामध्ये औजमधुन मिळणारे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे लागणार आहे. वाड्या वस्त्यांवरील पुरविण्यात येणारे पाणी इतर कामांसाठी वापरले जाऊ नये याकरिता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
    पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणा-या नियोजना अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याच्या गळत्या थांबविणे, पाटबंधारे खात्याने धरणावरच्या गळत्या थांबवून त्यासाठी लागणारा निधीचा प्रस्ताव पाठवुन शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. एकरुख उपसा सिंचन योजनेतील पाणी आता केवळ ११ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच राखीव ठेवले आहे. सोलापूर महानगरपालिकेनेही पाण्याचे नियोजन होण्याकरिता शहरातील पाणी कपात करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. २५० जनावरांच्या चारा छावणींचे प्रस्ताव आल्यास ताबडतोब मंजुर कराव्यात आणि रोजगार हमी योजनेची बिले किमान पंधरा दिवसांत मजुरांना देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
    कर्नाटकातील अलमट्टी धरणातुन सोलापूरसाठी दोन टीएमसी पाणी मिळविण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी एक पथक कर्नाटक राज्यात जाणार असून त्याबदल्यात नारायणपूर दुधगंगेचे दोन टीएमसी पाणी कर्नाटकला देण्याबाबत विनंती करण्यात येईल असेही पालकमंत्री बैठकीत म्हणाले.
    जिल्हाधिकारी डॉ. गेडाम बैठकीत म्हणाले की, आंधळगांव आणि नंदुर गावाचे विशेष नळ दुरुस्तीसाठी आलेले प्रत्येकी पाच लाखाचे प्रस्तावाबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल. तसेच मैंदर्गी नगरपालिके अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कमी खर्चाच्या योजनांचे प्रस्ताव ताबडतोब दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चारा छावणी सुरु करण्यासाठी प्रांताकडे देण्यात येणा-या प्रस्तावाची एक अगाऊ प्रत पाठविल्यास ताबडतोब निर्णय घेण्यास विलंब लागणार नाही असेही ते म्हणाले.  
       बैठकीस जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
Top