बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आर.एस.एम. उद्योग समूहाचे संस्थापक राजेंद्र मिरगणे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पोलिस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणास रविवार दि. १० फेब्रुवारी रोजीपासून मिरगणे यांच्‍या उपस्थितीत सुरुवात झाली.
     भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या प्रशिक्षणाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्‍यांच्या सरावासाठी देण्यात आलेल्या १२ एकर क्षेत्रातील स्वतंत्र मैदानाची पूजा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणारे माजी पोलिस निरीक्षक नाना कदम, उबाळे, व्‍ही. तिरुपती, दत्‍तात्रय जाधव, भारत पवार, सौ. विद्या सावळे, खंडेराव जगताप, गुंड, घळके, चिळ, मोहिते आदि उपस्थित होते.
     यावेळी बोलतांना नाना कदम यांनी यांनी म्हटले की, विद्यार्थ्‍यांच्‍या शारिरीक विकासाच्या सराव व मार्गदर्श़नासाठी ४३ शारिरीक शिक्षकांची तसेच स्पर्धापरीक्षेच्या माहिती व प्रशिक्षणासाठी १४ शिक्षकांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी मोठे वर्ग उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्‍यांकडून ३ महिन्यांत तयारी करुन घेण्यात येईल.
     राजेंद्र मरगणे बोलतांना म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांना सरावासाठी कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची तसेच आवश्यकतेची उणीव भासणार नाही. पूर्वीसारख्या ओळखीवर अथवा संबंधावर नोकर्‍या मिळण्याचे दिवस केंव्हाच संपले असून आता स्पर्धेच्या युगात ज्याच्याकडे कौशल्य तसेच कष्ट करण्याची तयारी आहे तोच या युगात टिकणार आहे. आपण आपली गुवणत्‍ता सिध्‍द करावी.  स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो या ब्रीदाप्रमाणेच तुम्ही आमच्या प्रशिक्षण केंद्रात वेळ आणि कष्टाची तयारी द्या आम्ही तुम्हाला हमखास यशाची खात्री देतो. या ठिकाणी अत्यंत उच्च दर्जाच्या गुणवंत शिक्षकांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्‍यांकरिता लायब्ररीची देखिल सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रशिक्षणात नीरंतरता तसेच आत्‍मविश्‍वासाने कष्ट करण्याची जीद्द असायला हवी. यावेळी व्ही.तिरुपती, दत्‍तात्रय जाधव, विद्या सावळे यांनी मार्गदर्शन केले.
 
Top