मुंबई -: राज्यातील विदर्भ भागात देशांतर्गत व परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नागपूर येथे २५ व २६ फेब्रुवारी  रोजी ‘अँडव्हान्टेज विदर्भ’ या नावाने 'उद्योग परिषद' आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या उद्योग परिषदेच्या आयोजनामध्ये विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री  (फिकी) यांचा सहभाग आहे.
          राज्यातील औद्योगिकदृष्टया मागास भागांमध्ये औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी उद्योजकांना या भागात उद्योगधंदे सुरु करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणाचा भाग म्हणून विदर्भ भागातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘उद्योग परिषद’ राज्याची उपराजधानी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. 
           उद्योग परिषदेचे आयोजन व संनियंत्रण करण्यासाठी उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्हयांचे पालकमंत्री, उद्योग विभागाचे राज्यमंत्री व प्रधान सचिव, विकास आयुक्त, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष, फिकीचे संचालक (पश्चिम क्षेत्र, वरळी, मुंबई), नागपूर आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य असून मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
    ‘अँडव्हान्टेज विदर्भ’ ही उद्योग परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याने स्थानिक स्तरावर या 'उद्योग परिषदेचे' आयोजन व संनियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 'स्थानिक आयोजन समिती' गठीत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग हे या समितीचे सहअध्यक्ष असून नागपूर महानगर पालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, नागपूर, अमरावती जिल्हाधिकारी, नागपूर व अमरावती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष या समितीचे सदस्य आहेत. तसेच नागपूर एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.
 
Top