सांगोला (राजेंद्र यादव) : सांगोला येथील श्री अंबिकादेवी यात्रेवर दुष्काळाचे सावट दिसून आले. दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा कमी भरली. तर जनावरे व शेतकरी छावण्यांवरच अडकल्याने शेतकरी वर्ग यात्रेत फिरकला नाही तर जनावरांचा बाजार म्हणावा तसा भरलाच नाही.
     दरवर्षी व्यापारी वर्गाला भरभरुन उत्पन्न देणारी सांगोल्याची यात्रा यावर्षी म्हणावी तशी भरली नाही. दुष्काळाचा परिणाम यावर्षीचा यात्रेवर झाल्याचे दिसून आले. एरव्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्दीतून वाट काढणे अवघड जायचे परंतु यावर्षी म्हणावी अशी गर्दीही यात्रेत दिसली नाही. केवळ परंपरेला फाटा द्यायचा नाही म्हणून ग्रामीण भागातील महिला देवीच्या दर्शनासाठी तसेच देवीला नैवेद्य दाखवायला रविवारी रथसप्तमीदिवशी आपल्या बाळगोपाळांसह आल्या. तेवढीच काय ती गर्दी रविवारी दिसून आली.
     यात्रेत आलेल्या व्यापार्‍यांची घोर निराशा यावर्षी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरवर्षीपेक्षा कमी गिर्‍हाईक असल्याने त्यांचा व्यवसाय ज्या प्रमाणात त्यांना अपेक्षित होता तो झालेला नाही. यात्रेतील पाळण्यासारख्या मनोरंजनाच्या जागा जादा रक्कमेत लिलावाने गेल्याने व जागाभाडेही चांगले मिळाल्याने यात्रा समिती मात्र नेहमीप्रमाणे फायद्यातच राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यात्रा समितीच्यावतीने यावर्षी विविध स्पर्धा घेतल्या. बक्षिसेही चांगलीच ठेवली. जनावरांसाठी पाणी आदी सोयीसुविधा यात्रेकरुंना पुरविल्या. मात्र यात्रेत येणारे गिर्‍हाईक जादा प्रमाणात न आल्याने यावर्षी दुष्काळाचा परिणाम जाणवत होता.
     महाराष्ट्रात खिलार जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या सांगोला यात्रेतील जनावरांचा बाजार यावर्षी म्हणावा तेवढा भरला नाही. जनावरे छावणीवर असल्याने जनावरे यात्रे आली नाहीत. तर कवडीमोल किंमतीने जनावरे विक्री होत असल्याने शेतकर्‍यांनी आहे ती जनावरे छावणीवरच ठेवणे पसंद केले. एकदा का छावणीतून जनावरे काढली की मग पुन्हा दोन-चार दिवसानंतर ही जनावरे छावणीत न्यायची म्हटले की पुन्हा कागदपत्रांची जुळवणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनावरे आहेत तिथेच छावणीत ठेवल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. एरव्ही 40 ते 45 हजारांना विकला जाणारा बैल सध्या 20 ते 25 हजार रुपयांनाच विक्री होत असल्याने दरवर्षी कोट्यावधी रुपयांची जनावरांच्या बाजारात होणारी उलाढाल यावर्षी झाली नाही. कर्नाटक, आंध्रप्रदेश, कोकण, मराठवाडा, विदर्भातून येणारे व्यापारी यावर्षी चांगल्या खिलार जनावरांच्या खरेदीपासून वंचित राहिल्याचे जाणवले.  
    यात्रेत आलेल्या व्यापार्‍यांना इतर म्हणजे जत, जवळा आदी ठिकाणच्या यात्रेपेक्षा जरा बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. मात्र दरवर्षीपेक्षा यात्रा कमी भरल्याचेही त्यांनी मान्य केले.
 
Top