उस्मानाबाद -: पुढील महिन्‍यात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नूतन कार्यकारिणीची निवड करण्‍यात येईल याठिकाणी मनसेचे चांगले वातावरण नसल्‍यामुळे मनसेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्‍याचे मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे शनिवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सांगितले.
      शनिवारी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उस्मानाबाद शहरात आगमन झाले. ठाकरे यांच्‍या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्‍यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर डीजीटल बॅनर लावले होते. मात्र मनसेतील अंतर्गत गटबाजी राज ठाकरे यांच्यासमक्ष उघडकीस आली. शिंगोली येथील सर्कीट हाऊसमध्ये ठाकरे पदाधिका-यांच्या भेटी घेणार होते. सुरुवातीस उस्मानाबाद-कळंब विधानसभा गट भेटीसाठी गेला असता, दोन गट पडले. कळंब तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षाविरूध्द तक्रार केली, तर जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्षाविरूध्द तक्रार केली. तेव्हा राज ठाकरे चांगलेच भडकले.नंतर त्यांनी भेटी बंद करून, बैठकच रद्द केली.
     दुपारी ३.२० वाजता त्यांनी पत्रकारांची औपचारिक भेट घेतली.यावेळी त्यांनी सांगितले की, मला त म्हटले की, ता कळते...तसेच सितावरून भाताची परिक्षा कळते. उस्मानाबाद जिल्ह्यातील वातावरण पक्षासाठी योग्य नाही. म्हणून संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. नविन कार्यकारिणी एक महिन्यात निवडण्यात येणार आहे.
 अनेक लोक मनसेत येवू इच्छितात. अनेकांची पक्षात येण्याची इच्छा आहे, मात्र या जिल्ह्यातील वातावरण योग्य नाही. जसा राज ठाकरेवर लोकांचा विश्वास आहे, तसाच विश्वास कार्यकर्त्‍यांवर पाहिजे.
     अवघ्या पाच मिनिटातच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. मी येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी आलो नसून, फक्त भेटण्यासाठी आलो आहे. मी जे काही बोलेन ते आता जालना सभेतच, असे सांगून ते तात्‍काळ मुंबईकडे रवाना झाले.
 
Top