बार्शी :  पुण्याहून मराठवाडा विदर्भ दर्शनाला ज्येष्ठ नागरिकांना घेऊन निघालेल्या एम.एच. १२ एच.बी. २०२५ या खाजगी सिध्दीविनायक ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली. अग्नीशमनच्या जवानांची तात्काळ मदत झाल्याने बसचे नुकसान टळले. सदरच्या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
     सदरची घटना देवणे गल्ली परिसरातील प्रसन्नदाता गणेश मंदिराजवळ घडली. येथे असलेल्या कालीकामाता मंदिराजवळ प्रवाश्यांच्या भोजनाची सुविधा करण्यात आल्याने सर्व प्रवाशी वाहनातील मोजके साहित्य घेऊन बसच्या खाली उतरले होते. यावेळी सदरची घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला. सदरच्या वाहनात १८ महिला व ड्रायव्हरसह १२ पुरुष होते. थोड्या वेळातच बसने पेट घेतल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आरडा ओरडा सुरु केला.  गाडीच्या डायव्हरच्या बाजूला असलेल्या बॅटरीकडून गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली. हळूहळू डायव्हरच्या केबीनमध्ये आगीचे लोट पसरले. सर्वत्र धुराचे लोट प्रचंड पसरले होते.
     यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित रसाळ या परिसरात राहणारे नगरपरिषदेचे निवृत्त फोरमन शेळगावकर व प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या कार्यकर्त्‍यांनी वाहनावर पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरपरिषदेच्या अग्निमशन दलास तसेच बार्शी पोलिसांना सदरच्या घटनेची खबर देण्यात आली. अग्निशमन विभागाचे सुपरवायझर हेमंत राऊत, भारत गुंड, कैलास धुमाळ यांच्या टिमने त्वरीत आग आटोक्यात आणली. सदरच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी न झाल्याने प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सदरच्या घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही.
 
Top