सांगोला (राजेंद्र यादव) -: आ. गणपतराव देशमुख यांच्या आमदार फंडातून शहरातील भाजीमंडई येथील काँक्रीटीकरण, पुजारवाडी येथील सटवाई मंदिरचा सभामंडप व मिरज रोडवरील विजयनगर येथे सभागृहाचे बांधकाम अशा तीन कामासाठी सुमारे २२ लाख रूपयाचा निधी तर हिंदु स्मशानभूमीमध्ये सुविधांसाठी १३ व्या वित्त आयोगातून १७ लाख ५0 हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला असल्याची महिती नगराध्यक्ष मारुती बनकर व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिली.
सांगोला शहरातील विकासकामासाठी आ. गणपतराव देशमुख यांनी आपल्या आमदार फंडातून नगरपरिषदेसमोरील भाजी मंडईमधील संपूर्ण परिसर डांबरीकरण करण्यसाठी व भाजी विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी ६ लाख ४0 हजार रूपयाचा निधी तर पुजारवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या सटवाई मंदिरात भाविक भक्तांची गैरसोय लक्षात घेऊन सुसज्ज असे सभामंडप उभारण्यासाठी आमदार फंडातून ६ लाख, न.पा. फंडातून २ लाख असा ८ लाख २५ हजार रूपयांचा निधी तसेच मिरज रोडवरील विजयनगर येथे डवरी, गोसावी, बहुरूपी समाजासाठी सभागृह बांधकामासाठी ७ लाख रूपयेचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
आमदार देशमुख यांनी वरील तीन कामासाठी २२ लाख रूपयाचा निधी दिल्यामुळे ही काम येत्या तीन महिन्याच्या आत पूर्ण केली जाणार आहेत. सांगोला शहरातील हिंदु स्मशानभूमीत बर्निंग शेड, बसण्यासाठी कठडे, काँक्रीटीकरण, फरशी आदी कामासाठी १३ व्या वित्त आयोगातून १७ लाख ४२ हजार रूपयाची तरतूद केली असल्याचे नगराध्यक्ष मारुती बनकर यांनी सांगितले. या सर्व कामाच्या विकास कामाच्या निवीदा येत्या २ दिवसात काढण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्ष बनकर यांनी दिली.