सांगोला (राजेंद्र यादव) -: ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्यात ११ गावठाण व ४६२ वाड्या-वस्त्यावरील सुमारे १ लाख ६ हजार ६३४ लोकसंख्येला ७१ टँकरने १६२ खेपाद्वारे दैनंदिन पाणी पुरवठा सुरू आहे. शासनाचा गेल्या वर्षभरात तालुक्यातील नागरीकांची तहान भागविण्यासाठी सुमारे ७ कोटी रूपयांचा निधी खर्ची पडला असून येत्या मे अखेर तालुक्यास भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.सांगोला तालुक्यात चालू वर्षी १९७२ पेक्षाही भयानक मोठा दुष्काळ पडला असून सलग तीन वर्षे पाऊस न पडल्यामुळे तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर, नागरीकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावोगावच्या पाणी पुरवठय़ाच्या विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या असून हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने अबालवृद्धांसह नागरीक महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. तहसीलदार व पंचायत समितीच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मागेल तिथे गांव वाडी वस्तीवर टँकर मंजूर करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रय▪सुरु केले आहेत. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची एकमेव वरदायीनी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून आहे. सध्या ८२ पैकी ७0 ग्रामपंचायती शिरभावी योजनेतून एकदिवसाआड पाणी घेत असून ३२ ग्रामपंचायती एक दिवस गावठाण व एक दिवस वाडी वस्तीवर असा पाणीपुरवठा करीत असून ३२ ग्रामपंचायती गावास एकदिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे उत्पन्न तोकडे असल्याने शिरभावी योजनेतून पाणी घेवून पाणीपुरवठा करणे परवडत नसल्याने गावात टँकर किंवा या योजनेतून एकदिवसाआड पाणी पुरवठा करीत आहेत. शासनाने टंचाईग्रस्त गावातील पाणीपट्टीची रक्कम टंचाई निधीतून अदा केल्यास या गावाना योजनेतून पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
उजनी धरणातून पाणी सोडून पंढरपूर येथील इसबावी बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेतला आहे. या बंधार्यातील पाण्यावर पंढरपूर शहर, तालुका व सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असून नदीकाठ परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात बंधार्यातून पाणी उपसा करीत असल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. जर बंधार्यातून पाणी उचलले नाही तर दोन महिने पुरेल इतपत पाणीसाठा उपलब्ध असून बंधार्यातून पाणी उपसा सुरूच राहिला तर पंधराच दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहणार असल्याने बंधार्यातील पाणी उपसा थांबविणे गरजेचे आहे.