मुंबई :- स्वबळावर लढून राज्यात मनसेची सत्ता आणणारच, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विशाल युतीच्या चर्चेची खिल्ली उडवली. अनेक मतदारसंघांत मराठी मतदारांना वगळण्यात येत असून, हे षड्यंत्र आहे. या विरोधात लढण्यास तयार राहा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
        मनसेच्या सातव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यात राज यांनी उद्योगपती रतन टाटांशी झालेली भेट शुभसंकेत असल्याचे म्हटले. राज म्हणाले, स्थापनेपासूनच राज्यभर पसरलेला आपला पक्ष आहे. सभांना होणारी गर्दी मतांत परिवर्तित होते की नाही अशी पंडितांना शंका वाटत आहे; परंतु लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत याचे चित्र त्यांना दिसेलच, असेही ते म्हणाले.
        गेल्या दोन दिवसांपासून राजकीय गोटात शिवसेना-भाजप-रिपाइं आणि मनसेच्या महायुतीची चर्चा सुरू आहे. त्यावर राज म्हणाले की, वर्तमानपत्रांतून बातम्या येताहेत, त्यांना दुसरा उद्योग नाही. सकाळी टाळी आली, त्याला मी दुपारी टाटा केला. स्वत: आत्मपरीक्षण करा, खिडकीतून डोळे काय मारता, असा टोलाही शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज यांनी लगावला.
 
दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचा पगार
मनसेच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचा पगार पक्षाच्या दुष्काळ निधीला दिला आहे. या रकमेचा चेक राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला.
 
Top