पिंपरी :-  दुष्काळामुळे राज्यातील लाखो लोकांचे हाल होत आहेत. अशा दुष्काळग्रस्तांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून शिवराय प्रतिष्ठान प्रस्तूत 'जाहले छत्रपती शिवराय' या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी येथील काळेवाडी रोडवरील हॉटेल कुणाल गार्डन शेजारी दि. 5 ते 9 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता होणा-या या महानाट्यातून जमा झालेला पैसा मदतनिधी म्हणून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.
        पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मयूर कलाटे मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास संघाची पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील पिंपळे गुरव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता असलेले पिंपरी-चिंचवडच्या किवळेगावचे माजी सरपंच आणि शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुदाम तरस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मयूर कलाटे, महानाट्याचे व्यवस्थापक कृष्णा वडणे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यावेळी उपस्थित होते.
       'जाहले छत्रपती शिवराय' या महानाट्यातून शिवरायांचा खरा आणि संपूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. शिवकालीन रणांगण कसे होते, त्यावेळच्या चित्तथरारक लढाया प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभ्या राहतील असे प्रसंग, हत्ती, घोडे, उंट आणि बैलजोडी यांचाही प्रसंगानुरूप समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवकालीन संस्कृती आणि शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी या महानाट्यातून उपलब्ध होणार आहे.
       राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सध्याचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी सर्वप्रथम संगीतबध्द केलेली ही नाट्याकृती आहे. या महानाट्याचा पहिला प्रयोग 1996 मध्ये झाला होता. 2008 पासून या महानाट्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासून या चार वर्षांत 40 प्रयोग झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 2010 नंतर प्रयोग होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भक्ती-शक्ती, चिंचवड, पिंपरी, सांगवी आणि विशालनगर येथे प्रयोग झाले आहेत.
     तीन मजली फायबरचा भव्य रंगमंच, नेत्रदीपक प्रकाश योजना, आतषबाजी, 200 कलाकारांचा संच, मर्दानी लढाया, खटकेबाज संवाद, ओघवते निवेदन, अजय-अतुल यांचे अवीट गोडीचे संगीत आणि कर्णमधूर गाणी या जोरावर रसिक प्रेक्षकांना साडेतीन तास खूर्चीवर खिळवून ठेवण्याची किमया या महानाट्यातून साधण्यात आली आहे.
      शिवकालीन न्याय व्यवस्था, महिलांचा सन्मान, मराठी मातीचा अभिमान, दुष्काळात जनतेची उपासमार होऊ नये म्हणून धान्य बँक, बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी केलेल्या उपाययोजना आणि शत्रूशी लढताना वापरलेला 'गनिमी कावा', अशा महत्त्वपूर्ण विषयांना हात घालणारे प्रसंग या महानाट्यातून सादर करण्यात येणार आहेत. सोफा आणि खूर्ची अशी मिळून साडेपाच हजार आसन व्यवस्था राहणार आहे.
       अन्याय अत्याचाराने पिडित जनता दुष्काळात होरपळू नये म्हणून शिवाजी महाराजांनी अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे त्याकाळात दुष्काळातही जनतेला पोटभर अन्न मिळत असे. सध्या राज्यात दुष्काळामुळे लाखो कुटुंबांचे पाणी आणि अन्नाविना हाल होत आहेत. त्यांना आर्थिक स्वरुपात मदत करता यावी म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यासाठी आलेला खर्च वगळता शिल्लक उत्पन्न दुष्काळग्रस्तांना मदतनिधी स्वरूपात देण्यात येईल, असे सुदाम तरस यांनी सांगितले.
 
Top