सांगोला (राजेंद्र यादव ) :- म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत सोडल्यानंतर या पाण्याने आज सायंकाळी जवळा हद्दीत प्रवेश केला. भीषण दुष्काळात नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिक अबालवृध्द गर्दी करीत आहे.
    गुरुवारी दुपारी गळवेवाडी येथे नाम. रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते पाण्याचे जलपूजन करुन कोरडा नदीत पाणी सोडण्यात आले. याचवेळी अनेक माताभगिनींनी नदीची ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. तर अनेक नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात व भीषण दुष्काळात नदीला आलेले पाणी पाहून प्रत्येकाच्या चेहर्‍यावरुन आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता हे पाणी आगलावेवाडी येथे आल्यानंतर आगलावेवाडी, जवळा, वाढेगांव येथील नागरिकांनी तसेच बाळगोपाळांनी नदीच्या पाण्यात उतरुन आनंद लुटला. या पाण्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सोडलेले या पाण्याने शुक्रवारी दुपारपर्यंत 12 कि.मी. चा प्रवास पूर्ण केला आहे.
      सोडलेले हे पाणी कुठपर्यंत आले आहे याची माहिती देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. यातीलच एक अधिकारी शाखा अभियंता बी.एस.लोहकरे हे सकाळपासूनच आगलावेवाडी परिसरात तळ ठोकून होते. ते आपल्या वरिष्ठांना पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती भ्रमणध्वनीवरुन देत होते. ते म्हणाले की, काल सोडलेले पाणी आज सायंकाळपर्यंंत जवळा येथे पोहोचेल. जवळ्यापूर्वीचे 3 बंधारे सकाळपर्यंत पाण्याने भरल्यानंतर पाणी पुढे सरकत आहे. त्यानंतर कोरडा नदीतील इतर बंधारे भरत हे पाणी तीन ते चार दिवसात वाढेगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याचे हे पाणी 100 क्युसेक्स ने सोडले असून 21 दिवस हे पाणी सोडले जाणार असल्याचे सांगत त्यांनी सिंगनहळ्ळी परिसरातील नदीकाठचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे पाणी वेगाने पुढे सरकत असल्याचे त्यांनी सांगितले.
      कोरडा नदीच्या पात्रात गळवेवाडी ते वाढेगांव दरम्यान 15 बंधारे असून त्यापैकी 10 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. हे सर्व बंधारे दोन गेझ (1 मीटरपर्यंत) भरुन घेण्याचे आदेश अधिकार्‍यांना मिळाले आहेत. कोरडा नदीत वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने वाळूचे मोठे मोठे खड्डे पाण्याने भरण्यासाठी वेळ लागत असल्याने पाणी येण्यास उशीर होत असला तरी वाढेगांवपर्यंत पाणी येणार आहे. वाढेगावचे शेतकरी रामहरी नलावडे, नितीन पाटील, अनिरुध्द पुजारी, महादेव दिघे यांनी आगलावेवाडी येथे जाऊन पाण्याचा वेग पाहून आपल्या गावापर्यंत कधी पाणी येईल याची माहिती घेतली.
 
Top