सोलापूर :- पुस्तकांमुळे मुलांवरती संस्कार घडतात त्यामूळे प्रत्येक लहान व कुमार वयातील मुलाने सुसंस्कार करणारे वाड्मय वाचले पहिजे अशी अपेक्षा ज्येष्ट साहित्यिक डॉ. गो.मा.पवार यांनी व्यक्त केली.
        महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा शासकीय ग्रंथालय, मराठी भाषा विभाग, आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 मार्च पर्यंत स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ग्रंथोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशी आयोजित शालेय विद्यार्थ्यांचे कथाकथन या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पवार बोलत होते  यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी आणि शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. क्षीरसागर उपस्थित होते.
      डॉ. पवार आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, मराठीने अभिमान बाळगावा अशी बालसाहित्याची मराठी मध्ये निर्मिती झाली आहे. प्र.के.अत्रे, चि.वि.जोशी, ना.धो. ताम्हणकर, साने गुरुजी हे केवळ मराठीच नव्हे तर  भारतीय भाषेतील निसंशय श्रेष्ट लेखक आहेत. श्यामची आई या पुस्तकाद्वारे साने गुरुजींनी नागरी आणि मानवी संस्काराचे पोषण होईल  असे लिखाणात्मक संस्कार केले आहेत. त्यामूळे बाल व कुमारांनी वाचनाकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
       कथाकथन करताना समाजातील उणीवा खेळकर पध्दतीने दाखवून बोचेल परंतू चांगला वाटेल असा उपहास केला पाहिजे. नुसती कथाच नाहीतर कथेचा आशय देखील चांगला असणे महत्वाचे आहे. ग्रांथिक पध्दतीचे वाचन न करता कथाकथन हे नेहमी कथेचे स्वारस्य टिकेल अशाच पध्दतीने सादर करुन प्रेक्षकांशी प्रत्यक्ष बोलल्याप्रमाणे निवेदनात्मक करणे गरजेचे आहे. मुलांच्या साहित्य गुणाला प्रोत्साहन देणारा ग्रंथमहोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही  शेवटी डॉ. पवार म्हणाले.
     अहंकारी आपल्या भाषणात म्हणाले की, भावी पिढीतून चांगले साहित्य आणि साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत याकरिता ग्रंथोत्सवासारखा उपक्रम घेऊन त्यामध्ये शालेय मुलांचा सहभाग वाढविला पाहिजे. यामूळे त्यांच्या साहित्यिक गुणांना प्रोत्साहन मिळून सोलापूर जिल्ह्यातील साहित्याचा वारसा निश्चितच पुढे जाईल.
      या स्पर्धेत बी. एफ. दमाणी प्रशालेच्या अपूर्व कुलकर्णी याला प्रथम क्रमांकाचे, मॉडर्न हायस्कूलच्या मिनल मराळीस द्वितीय तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस बी.एफ दमाणी प्रशालेचा ऋषिकेश किसन दाडगे आणि मॉडर्न हायस्कूलचा वेदांत ढगे यांना जाहिर झाले असून उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाची लावण्या वद्दी ठरली आहे

सोलापूर ग्रंथोत्सव 2013 चा उद्या समारोप समारंभ

सोलापूर :- महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा शासकीय ग्रंथालय, मराठी भाषा विभाग, आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 मार्च पर्यंत स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ग्रंथोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक 7 मार्च रोजी या तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप समारंभ होणार आहे.
       जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर अलका राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात ग्रंथोत्सवातील स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
         ग्रंथप्रेमींना ग्रंथ खरेदी करण्यासाठी उद्याच्या दिवसाची शेवटची संधी आहे. ग्रंथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनामध्ये विविध खाजगी आणि शासकीय ग्रंथागाराची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून ग्रंथप्रेमींना ग्रंथ खरेदी करण्यासाठी उद्याच्या दिवसाची शेवटची संधी आहे.
 
Top