नळदुर्ग -: शेतजमीन मोजणी न करता मोजणी अर्जदार हजर नसल्‍याचे कारण पुढे करुन पंचाची दिशाभूल करुन मोजणी अर्ज निकाली काढल्‍याची तक्रार वागदरी (ता. तुळजापूर) येथील सौ. बालिका सुभाष जाधव या महिला शेतक-याने जिल्‍हाधिका-याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
      वागदरी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी महिला सौ. बालिका सुभाष जाधव यांनी त्‍यांच्‍या नावे वागदरी शिवारात गट नं. 46 मध्‍ये असलेल्‍या शेत जमिनीची मोजणी करण्‍याकरीता दि. 10 ऑक्‍टोबर 2011 रोजी रितसर मोजणी भरलेली आहे. त्‍याच दिवशी त्‍यांचे शेतशेजारी राम उमराव माडजे यानी या शिवारात त्‍यांच्‍या नावे असलेल्‍या गट नं. 47 मधील शेतजमिनीची रितसर मोजणी भरले आहे. दि. 20 जानेवारी 2012 रोजी भुमी अभिलेख कार्यालय, तुळजापूर येथील संबंधित मोजणी कर्मचारी राम माडजे यांच्‍या गट नं. 47 मधील शेतात आले. परंतु गट नं. 46 मध्‍ये बालिका जाधव यांच्‍या शेतात आलेच नाहीत. मोजणीच्‍या दिवशी बालिका जाधव ह्या जातीने आपल्‍या शेतात उपस्थित असताना देखील त्‍यांच्‍याशी एक शब्‍दही न बोलता त्‍यांच्‍या शेतात न जाता मोजणी कर्मचा-यांनी राम माडजे यांच्‍या शेतात बसून मोजणीच्‍या वेळी मोजणी अर्जदार बालिका जाधव हजर नसल्‍याचा पंचनामा करुन पंचाची दिशाभूल करुन त्‍यांचा मोजणी अर्ज निकाली काढल्‍याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणी बालिका जाधव यांनी उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे लेखी तक्रार दिली असून पंचनामा न करणा-या संबंधिताची चौकशी करुन आपल्‍या शेतजमिनीची मोजणी करुन मिळावी, अशी मागणी केली आहे.
भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर, येथे बराच सावळा गोंधळ चालू असून शेतक-यांची मोठ्याप्रमाणात मा‍नसिक व आर्थिक पिळवणूक या कार्यालयाकडून होत असल्‍याचे समजते. नळदुर्ग येथील रहिवासी असलेल्‍या सुलोचना विश्‍वनाथ बिराजदार यांनी देखील वागदरी शिवारात गट नं. 68 मध्‍ये आपल्‍या नावे असलेल्‍या शेत जमिनीची मोजणी करण्‍याकरीता दि. 8 फेब्रुवारी 2011 रोजी भुमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे रितसर तातडीची मोजणी भरलेली असताना देखील मोजणी कर्मचारी शेजारील शेतात ऊस असल्‍याने मोजणी करता येत नाही, असे कारण पुढे करुन परत गेले. ते अद्याप एक वर्ष झाले तरी मोजणीसाठी आलेच नाहीत. त्‍यानी सुध्‍दा याबाबत जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे लेखी तक्रार दिली आहे. भूमी अभिलेख तुळजापूर कार्यालयात चाललेल्‍या सावळ्या गोंधळावर जिल्‍हाधिकारी यांनी लक्ष देऊन शेतक-यांना वेळेत न्‍याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
 
Top