उस्मानाबाद :- परंडा शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणारे भोत्रा कोल्हापूरी बंधारा     मागीलवर्षीच्या  जुन महिन्यात तर  खासापूरी धरण डिसेंबर महिन्यात कोरडे पडले होते. त्यामुळे परंडा शहरास टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. मात्र जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी या परिसराचा भू-भौतिक सर्व्हेक्षण करुन बंधारा आणि धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहीर घेवून तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना घेण्याबाबत नगर परिषदेला सांगितले होते. नगर परिषदेनीही त्यानुसार कार्यवाही करुन ही योजना पूर्ण केल्याने आता परंडा शहरास या योजनेतून पाण्पीपुरवठा केला जात आहे. या तात्पुरत्या पुरक पाणीपुरवठा योजनेच्या यशस्वीतेमुळे एैन ऊन्हाळयाच्या काळात टँकरवर होणाऱ्या तब्बल 40 लाख रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे. योग्य नियजन आणि व्यवस्थापनामुळे खर्चात बचत होवून नागरीकांना पाणीही उपलब्ध झाल्याने याचे महत्व अधिक आहे.
      परंडा शहरास जुन 2012 पासून प्रथम 10 नंतर 20 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता. टँकरवर होणारा खर्च लक्षात घेता अन्य पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी नगर पालिका प्रशासनामार्फत परंडा नगर परिषदेला प्रथम भोत्रा केटीवेअर परिसरात विहीर घेणे तसेच त्यावर विद्यूतपंप बसविणे आणि नंतर पाईपलाईनव्दारे जॅकवेलमध्ये पाणी आणणे या योजनेला मान्यता दिली होती. अंदाजे 4.99 लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली होती.नगर परिषदेने ही योजना  पूर्ण केली. त्यामधून दररोज अडीच ते 3 लाख लिटर पाणी उपलब्ध झाल्यामुळे डिसेंबर महिन्यातच 20 पैकी 10 टँकर कमी करण्यात आले त्यामुळे डिसेंबरपासून 10 टँकरवर होणा-या खर्चात 20 लाख 20 हजार रुपयांची बचत झाली.
      भोत्रा बंधा-याप्रमाणेच खासापूरी धरणातील बुडीत क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेवून त्यामधून तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या 11 लाख 37 हजार रुपयांच्या नगर परिषदेच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिली होती. तसेच तात्काळ निधीही उपलबध करुन दिल्याने नगर परिषदेने ही योजना तात्काळ पुर्ण केली. या योजनेतून दररोज 2 ते अडीच लाख लिटर पाणी उपलब्ध होवू लागले. या दोन्ही योजना कार्यान्वित झाल्याने 18 हजार लोकसंख्या असलेल्या परंडा नगर परिषदेची दैनंदिन पाण्याची गरज भागू लागली. क वर्ग नगर परिषद असलेल्या परंडा शहराची टंचाई कालावधीतील मानकाप्रमाणे दैनंदिन पाण्याची गरज ही 6 लाख 50 हजार लिटर इतकी आहे. पुरक तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांमधून पाणी उपलब्ध झाल्याने आता शहरास टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची गरज राहीली नाही त्यामुळे या शहराचा टँकरव्दारे होणारा पाणीपुरवठा 27 फेब्रुवारी पासूनच बंद करण्यात आला. दोन्ही पाणीपुरवठा योजना यशस्वी ठरल्याने मार्च ते जुन 2013 पर्यंत टँकरवर होणाऱ्या तब्बल  40 लाख रुपयांच्या खर्चात आता बचत झाली आहे.
       या योजनांबरोबरच आता खासापूरी धरणातील बुडीत क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या वि‍हिरींमधील गाळ काढण्याचे निर्देशही डॉ. नागरगोजे यांनी नगर परिषदेला दिले आहेत. गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यास टंचाई कालावधीतही शहरास पाणी कमी पडणार नाही. याशिवाय परंडा शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या 54 विंधन विहीरी असून त्याव्दारेही शहरास दररोज 1 ते सव्वालक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे.
 
Top