उस्मानाबाद -: पाण्याविषयी चर्चा करताना केवळ पाणी उपलब्धता व त्याचा पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापर या गोष्टींचाच विचार होतो. या पार्श्वभुमीवर शुक्रवार रोजी उस्‍मानाबाद शहरातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पिण्याच्या पाण्याची  शुध्दता हा विषय जाणून घेतला.
    जागतिक जलदिनानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने खाते ओळख कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दि. 22 मार्च रोजी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा या कार्यालयाची माहिती जाणून घेण्यात आली. पाणी परीक्षणाचे काम करणा-या या कार्यालयाची माहिती प्रभारी मुख्य अणूजीव शास्त्रज्ञ डी.बी.शिंदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एफ.एम. पठाण आणि रासायनिक सहायक एस.एल. पांचाळ यांनी प्रात्यक्षिकांद्वारे दिली.
         पाणी नमुन्यांची  अणूजीव व  रासायनिक तपासणी, ब्लिचिंग पावडर तपासणी, तुरटी नमुने तपासणी, आयोडिनयुक्त मीठ तपासणी, शौच नमुने तपासणी आणि साथकाळात प्रतिजैविके संवेदनशिलता चाचणी अशा प्रकारची कार्य या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत केली जातात. पिण्याच्या पाण्याची  जैविक गुणवत्ता चाचणी आणि रासायनिक पृथक्करण याठिकाणी केले जाते.
   पिण्याच्या पाण्यातून होणारे पोलीओ, टायफाईड, कावीळ, कॉलरा, अतिसार असे जलजन्य आजार टाळण्यासाठी तसेच रासायनिक घटकांमुळे होणारे फ्लोरासिस, मुतखडा, हाडांचे आजार, दंतक्षय असे आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने तपासणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांना पाणी नमुने तपासणी सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात येते. तर खाजगी संस्था, व्यक्ती आणि अन्य आस्थापनांकडून शुल्क आकारुन ही तपासणी करुन दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
   पिण्यासाठी सुरक्षित उदभवाचे पाणी घेणे आवश्यक असते. विंधनविहीरीतून जास्त खोलीतून पाणी घेतल्यास घातक रसायनाची शक्यता वाढते. वैयक्तिकरित्या प्रत्येकांने पाणी शुध्दीकरणासाठी टिसीएल पावडरसोबत लिक्विड क्लोरीन, युव्ही टयुब्ज, आरओ फिल्टरर्स, कॅन्डल फिल्टर्स आदिंचा वापर केला तर जलजन्य रोगांपासून बचाव करु शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या अधिकारी व तंत्रज्ञांचे तसेच प्रसारमाध्यम  प्रतिनिधींचे स्वागत केले. सूत्रसंचालन दुरमुद्रक चालक अशोक माळगे यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी अर्जुन परदेशी, एस. जी. शेळके, मकरंद नातू, अयुब पठाण, नरहरी गुटटे, सिध्देश्वर कोंपले, तानाजी सुरवसे,  अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशिकांत पवार, चित्रा घोडके यांनी सहकार्य केले.
 
Top