
मराठवाड्यातील कुसळी गवत व खडकाळ माळरानावर असलेल्या मूर्टा-मानमोडी (ता. तुळजापूर) या गावाच्या शिवारात शासकीय यंत्रणेच्या मदतीशिवाय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतक-यांनी आधुनिकेतची कास धरत, पाण्याचा काटकसरीने वापर करून शंभर टक्के द्राक्षाचे उत्पादन घेऊन आश्चर्यकारक प्रगती केली असली तरी यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणावा तितका पाऊसकाळ न झाल्याने सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. मानवासह वन्यजीव, पशुपक्षी, पाळीव जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असून शेती व्यवसायाची अवस्था बिकट झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील डोंगराळ, खडकाळ भागात पाण्याचा योग्य नियोजन करून शंभर टक्के द्राक्षेचे उत्पादन घेवून यापूर्वी देश-विदेशात द्राक्षे निर्यातीत मूर्टा-मानमोडी गावाने गरूडझेप घेतली आहे. नळदुर्ग शहरापासून जवळच उत्तर दिशेला डोंगराच्या कुशीत असलेल्या या गावाच्या शिवारात प्रदीप कदम, भास्कर कदम, अतुल भोसले, मधुकर सुरवसे, आप्पास कदम, सेनापती पाटील, विश्वंभर सुरवसे, बळी मोरे, केशव पाटील, मानमोडी शिवारातील वैजिनाथ सुरवसे, बळीराम सुरवसे, भरत सुरवसे, मधुकर सुरवसे, प्रेमनाथ सुरवसे, सिताराम गायकवाड असे मिळून बहुतांश शेतक-यांचे जवळपास अंदाजे सहाशे एकर द्राक्ष बागेपैकी 80 टक्के द्राक्षबागा जळून गेल्याचे बोलताना युवा कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी गोपाळ सुरवसे यांनी सांगितले.
तुळजापूर तालुक्यातील मुर्टा व मानमोडी परिसरात द्राक्षांच्या थॉमसन, माणिक चमन, अंबे सिडलेस, टू ए कोन, तास ए गणेश आदीसह विविध जातींचे मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. मलेशिया, अरब अमिरात सह यूरोप मध्ये तर देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा, दिल्ली, पश्चिमबंगाल आदी परप्रांतात येथील शेतक-यांनी उत्पादित केलेले द्राक्षे निर्यात करण्यात आले आहे. परंतु मागील दोन ते तीन वर्षे द्राक्ष उत्पादक शेतक-यांना डावणीचा प्रादुर्भाव, अवकाळी पावसाचा फटका यासह अनेक नैसर्गिक सामन्यांना सामोरे जावे लागले. चालूवर्षी पाऊसकाळ कमी झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागला. औषधे, खते यांच्या किंमतीत गतवर्षीच्या तुलनेत झालेली भरीव वाढ, वातावरणातील बदल, मजुरीत झालेली दुप्पट वाढ, निसर्गाची अवकृपा, शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतक-यांबाबत असलेले उदासिन धोरण यासह विविध समस्यांच्या गर्तेत द्राक्ष उत्पादक सापडला आहे. जिद्दीने व प्रचंड कष्टाने उभ्या केलेल्या व जीवापाड सांभाळलेल्या द्राक्ष बागा या भागातून नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात असून शासनाने तात्काळ या शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी शेतक-यांतून केली जात आहे.