बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील गावाबाहेर असलेल्या कत्तलखान्यात सदृढ जनावरे असल्याने त्यांचा जीव वाचावा व त्यांची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करावी अशी, तक्रार काही दिवसांपूर्वी प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांनी दाखल केली. त्यावर वरिष्ठ पातळीवरुन आदेश प्राप्त झाल्याने सहआयुक्त एन.एन. सावकारे यांनी बार्शीत येऊन चौकशी केली.
     यावेळी धन्यकुमार पटवा यांनी दिलेल्या तक्रारी, छायाचित्रे, बातम्यांची कात्रणे, व्‍हीडीओ चित्रीकरणाची सी.डी., पशू वैद्यिकय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीचे, पोलिसांना, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी व जिल्हाधिकारी यांना केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे सादर केले. सदर प्रकरणी सत्य माहिती गोळा करुन 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यावेळी कत्तल करणार्‍या संबंधितानी गर्दी करुन जनावरे कत्तल करण्यास कोणीही अडथळे आणू नये, यावर आपल्या कुटूंबाचा उदरिनर्वाह चालतो, अशी आग्रही भूमिका मांडली.
     यावेळी सहआयुक्त सावकार यांनी पटवा असो अथवा कोणी तक्रारदार तसेच कोणतेही कसाई, नगरपालिकेच्या अधिकारी अथवा पोलिस यांच्यापेक्षा आपल्या कायद्यात काय तरतूद आहे याला अधिक महत्व असून त्याप्रमाणेच पशू वैद्यिकय अधिकारी बिराजदार व जगदाळे यांनी वागायला हवे होते तसेच यापुढेही वागायला पाहिजे. केवळ जनावरांची वैद्यकीय तपासणी करुन त्याप्रमाणे दाखला देण्याचे काम आपल्या विभागाचे असून त्याचे पुढे काय झाले अथवा कायद्या, बेकायद्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची व नगरपालिकेची असल्याचेही त्यांनी म्हटले.
     दुभत्या जनावरांच्या विम्याकरिता शासनाची 50% विमा योजना सुरु असून त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सह आयुक्तांनी पत्रकारांशी चर्चा करतांना केले.
 
Top