उस्मानाबाद -: जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या विविध तलावातून गाळ नेऊन तो शेतात टाकून जमीन सुपीक करण्याच्या प्रयत्नाने आता वेग घेतला आहे. शेतकरी स्वयंस्फूर्तीने व स्वत:च्या खर्चातून तलाव अथवा सिंचन प्रकल्पातील गाळ नेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्याच्या 90 तलावांमधून तब्बल 3 लाख 12 हजार 428 घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 3 हजार 12 एकर एवढी जमीन आता उपजावू होणार आहे तर आगामी काळात या तलावांच्या पाणीसाठ्यात 3 दशलक्ष घनमीटर एवढी वाढ होणार आहे.
    जिल्ह्यात सध्या बहुतांशी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत.त्यामुळे त्याठिकाणचा गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. हा गाळ आपल्या जमिनीत टाकून जमिन सुपीक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून शेतकरी करीत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनीही शेतकऱ्यांना हा गाळ नेण्याचे आवाहन केले आहे. गाळ नेताना शेतकऱ्यांकडून कोणतीही रॅायल्टी आकारण्यात येत नसल्याचे सांगितले. उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा यांनीही शेतक-यांचा सहभाग ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
    सध्या जिल्ह्यातील 113 प्रकल्पात 3 लाख 72 हजार 15  हजार 380 घनमीटर इतका गाळ आहे. सध्या 90 तलावातून शेतकरी गाळ नेत आहेत. जिल्ह्यात सध्या 39 पोकलेन, 133 जेसीबी, 756 ट्रॅक्टर आणि 254 टिप्परद्वारे गाळ काढला जात आहे. सध्या दररोज 69 हजार 511 घनमीटर गाळ काढला जात आहे. या कामांमुळे लोकसहभागातून आतापर्यंत काढलेल्या एकूण गाळामुळे 3 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी लागणा-या 12 कोटी 4 लाख रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच नापीक असणारी जमीनही सुपीक होणार असल्याने या जमिनीची वाढीव किंमत सुमारे 150 कोटी इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 30 कोटी रकमेचा गाळ काढला आहे. या गाळामुळे होणारा लाभ मात्र 162 कोटी इतका असल्याने अधिकाधिक शेतकरी स्वत:हून हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.   
 
Top