सोलापूर -: मागासवर्गीय सदस्यांनी एकत्र येऊन सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपदन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
    जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून रविवार रोजी श्री शिवछत्रपती रंगभवन येथे जिल्ह्यातील मागासवर्गीय जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व सरपंच व उपसरपंचांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रा. ढोबळे बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर कार्यकमाचे उदघाटक आ. बबन शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, कृषी सभापती जालींदर लांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, सांगली जिल्ह्यातील धामणेर गावाचे सरपंच शहाजी क्षिरसागर उपस्थित होते.
    कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, जनतेकडुन निवडुन आलेल्या सर्व मागासवर्गीय सदस्यांनी एकत्र येऊन मागसवर्गीयांना देत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा अभ्यास केला पाहिजे. तरच या योजनांचा फायदा त्यांना तळागाळापर्यंत पोहोचवता येईल. मागसवर्गीयांच्या हक्काचा विचार करुन मागासवर्गीय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी योजनांचा, नियमांचा अभ्यास करुन विचार करावा. चळवळीत काम करतांना समाजाच्या ऋणाची जाणीव ठेवून मागास समाजाला पुढे आणण्याच्या दृष्टीकोनातून सर्व योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    आमदार शिंदे यावेळी म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून निवडुण आलेल्या मागासवर्गीय लोकांना नक्कीच लाभ होणार आहे. अशा कार्यशाळा वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ठोस कार्यक्रमाची आखणी करुन विविध योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे करावी. तसेच त्यांना योजनांचा लाभ प्रत्यक्षरित्या त्वरीत मिळण्यासाठी अभ्यासुरितीने माहिती करुन द्यावी. ई स्कॉलरशिप राबविणा-या सोलापूरच्या समाज कल्याण विभागाने  राज्यासमोर आदर्श घालुन दिल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.
    उपाध्यक्ष श्री. गुळवे यांनी समाज कल्याण विभाग उत्तमरीतीने काम करत असल्याचे सांगुन विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सांगितले.
    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. कांबळे यांनी कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश सांगितला. आभार समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी मानले.
 
Top