नागपूर : प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला जात-पात कळत नाही. प्रेम करताना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे स्वप्न युगुल रंगवत असल्याने त्यांनी एकमेकांची माहिती घेणे आवश्यक आहे. परंतु तीही घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे. इतवारी स्थानकावर अशीच एक घटना बुधवारी उघडकीस आली. एका प्रेमवीराने छत्तीसगडहून प्रेयसीला पळवून इतवारी स्थानकावर आणून पळ काढला. इतवारी लोहमार्ग पोलिसांची तरुणीवर नजर गेल्याने ती चुकीच्या हातात जाण्यापासून बचावली आहे.
        प्रियकरासोबत सात जन्माचे फेरे घेण्यास आसुसलेल्या एका युवतीला अशा खेळात एक मोहरा झाल्याचे निदर्शनास आले. फसगत झाल्याचे कळले, परंतु वेळ निघून गेली होती. ती इतवारी रेल्वेस्थानकावर बेभान फिरत होती. तखतपूर, छत्तीसगड येथील या मुलीला तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. आई-वडील मजुरीचे काम करतात. तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून घरी सर्वांत मोठी आहे. शेजारीच राहणार्‍या युवकासोबत तिचे प्रेम जुळले. तो सेंट्रिंगचे काम करतो.
      या दोघांच्या प्रेमाची कुणकुण परिसरात लागल्याने हळूच चर्चा सुरू झाली. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मात्र घरच्यांनी प्रेमाचा विरोध केला. समाजही त्या कुटुंबाकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. हा विरोध असह्य होत असल्याने दोघांनीही पळून जाण्याचा बेत आखला. त्यानुसार दोघेही पुण्याला पळून गेले. पळून गेल्याची चर्चा वार्‍यासारखी पसरली. आई-वडिलांनी पुण्याला जाऊन तिला परत घरी आणले. पण कायमचे एकत्र येण्यासाठी पुन्हा त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघेही मंगळवारी घरून निघाले बिलासपूर ते नागपूर असा दोघांनीही सोबतच प्रवास केला. बुधवारी पहाटे दोघेही नागपूर स्थानकावर आले. ठरल्यानुसार येथून त्यांना पुण्याला जायचे होते. सदर तरुणी रेल्वेस्थानकाजवळ थांबवून पुण्याचे तिकिट काढायला जातो असे सांगून गेलेला प्रियकर बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे तिची कासावीस झाली. आपला प्रियकर पळून गेल्याने तिला धक्काच बसला. आता ती परत घरी जाऊ शकत नव्हती. अशातच तिने एकाच्या मदतीने इतवारी रेल्वेस्थानक गाठले. सकाळी ७.३0 वाजता सैरावैरा स्थितीत ती फलाट क्रमांक ५ वर भटकत असताना संतोष रामदास तिवारी या रेल्वे कर्मचार्‍याला दिसली. त्यांनी तिची विचारपूस केली. विश्‍वास संपादन करून तिला आधार दिला. नंतर लोहमार्ग पोलिसात आणले. तेथे कर्तव्यावर असलेल्या मंगला सहारे, महिला पोलीस शिपाई सविता मेo्राम व हवालदार चोरपागार यांनी तिची आस्थेने विचारपूस करून तिची रवानगी शासकीय वसतिगृहात करण्यात आली.

* साभार - पुण्‍यनगरी
 
Top