उस्मानाबाद -: नगदी व चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून अनेक शेतक-यांनी फळबागा घेतल्या आहेत. दाळींब, मोसंबी, चिकू, पेरु, केळी अशा फळबागा जिल्ह्यात दिसतात. यावर्षीच्या पाणीटंचाईमुळे अनेक शेतक-यांच्या फळबागा अडचणीत आल्या. या फळबागा वाचविण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्यासाठीचे मार्गदर्शन आता कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
         कृषी विभागाचे ग्रामस्तरावर काम करणारे कृषीसेवक, कृषीसहायक यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आपापल्या स्तरावर याबाबत फळबागा जगविण्यासाठीच्या करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेटीद्वारे मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार हे स्वत:ही जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधत आहेत. ठिबक सिंचन, आच्छादन, रासायनिक फवारणी अशा पद्धतीने फळबागा जगवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
          ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करुन पाण्याची बचत करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.  ठिबक झाडाच्या बुंध्याच्या जवळपास ठेवणे किंवा जेथे फळबागाच्या मुळ्या कार्यक्षम आहेत, तेथे ठिबक ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय, मल्चिंग अर्थात आच्छादन करुन फळबागा जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते, असे या शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. प्लास्टीक किंवा वाळलेल्या गवताचा आच्छादन म्हणून वापरणे आणि खोडापासूनच हे आच्छादन टाकावे. ठिबकचे पाणी जेथे जाते, तेथपर्यंत आच्छादन करावे, असा सल्ला शेतक-यांना दिला जात आहे. महिन्यातून दोनदा फळझाडावर आठ टक्के केओलीनची फवारणी करावी. यामुळे बाष्पीभवन कमी होईल किंवा पोटॅशिअम नायट्रेट दीड टक्के याची दोन वेळा फवारणी करावी. संयुक्त खताची फवारणी केल्यासही फळबागा तग धरु शकतील.
      पानगळ होणा-या डाळींब, पेरु आदी फळपीकांच्या झाडाच्या फांद्यांची संख्या कमी करावी, रोगग्रस्त व वेड्यावाकड्या फांद्या काढून टाकाव्यात. उन्हामुळे खोड तडकू नये म्हणून खोडावर बोर्डोपेस्ट लावावे. पाण्याचा योग्यवेळी योग्य वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे सकाळच्या ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, असा सल्लाही शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
          फळझाडांना फुलोरा येऊ देऊ नये अथवा आलेली फुले तोडणे आणि फळ काढणे आवश्यक असल्याचेही हे अधिकारी-कर्मचारी शेतक-यांना सांगत आहेत.
 
Top